‌म. टा. प्रतिनिधी,

खासगी कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्यांना मुंबई लोकलमधून प्रवास करण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. करोना संसर्गाची भीती कायम असल्याने रोगाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी ‘आधी गर्दी नियंत्रणासाठी उपाय, मग प्रवासाची मुभा’, असा सावध पवित्रा रेल्वे प्रशासनाने घेतला असल्याचे स्पष्ट होत आहे.

अत्यावश्यक सेवेसाठी सुरू केल्यानंतर रेल्वे आणि राज्य सरकारचे प्रतिनिधी यांच्यात गर्दी नियंत्रणासाठी बैठक पार पडली. या बैठकीत कार्यालयीन वेळेत बदल आणि रंगावर आधारित क्यूआर पास यंत्रणा, असे उपाय राबवण्यावर सविस्तर चर्चा पार पडली. सर्व महिलांसाठी लोकलमुभा दिल्यानंतर झालेल्या बैठकीत याच मुद्द्यांचा पुनरुच्चार झाला. उपायाशिवाय सर्वांना लोकल प्रवासाची मुभा दिल्यानंतर गर्दी वाढेल. यामुळे नियंत्रणात आलेला करोनाचा पुन्हा वेगाने पसरण्याची भीती आहे. उपाय केल्यानंतर सर्वांसाठी लोकल प्रवासाची मुभा असावी, यावर बैठकीत उपस्थित असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एकमत झाले होते, असे बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

‘सुरक्षित वावरच्या नियमांचे पालन करून उपनगरी लोकल फेऱ्या वाढवण्यासाठी रेल्वे नेहमीच तयार आहे. अतिरिक्त फेऱ्या वाढवण्याबाबत राज्य सरकारशी चर्चा करत बारकाईने काम करत आहोत, असे ट्वीट मध्य रेल्वेने केले. ‘राज्य सरकारच्या प्रस्तावावर मत पाठवण्यात येईल’, असे पश्चिम रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आहे.

राज्य सरकारचा प्रस्ताव

‘सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळा वगळता महिलांसह सर्व प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा’, ‘दर तासाला एक महिला विशेष लोकल आणि ‘अत्यावश्यक सेवेतील क्यू आर कोड पास असलेल्या प्रवाशांना केवळ गर्दीच्या वेळेत प्रवासाची मुभा’, असा प्रस्ताव राज्य सरकारने मध्य, पश्चिम रेल्वेसह रेल्वे पोलिस आयुक्त यांना पाठवला आहे. या प्रस्तावावर या तिन्ही यंत्रणांचे प्रतिसाद मागवण्यात आले आहेत.

१४००हून अधिक लोकल फेऱ्या

सर्व महिलांसह अत्यावश्यक सेवेतील १७ प्रवर्गांतील नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा आहे. सध्या मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मिळून प्रत्येकी ४ ते ४.५० लाख प्रवासी प्रवास करत आहे. तिन्ही मार्गावर सध्या १४०० हून अधिक लोकल फेऱ्या धावत आहे. सुरक्षित वावरच्या नियमानुसार या लोकलमधील प्रवासीक्षमता १० लाख इतकी आहे.

मुंबईकरांना लवकरच लोकलसेवा?

मुंबई : सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लवकरच रेल्वेची उपनगरी लोकल सेवा सुरू होणार असल्याचे संकेत राज्य सरकारकडून बुधवारी देण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यांपासून लोकलसेवा बंद आहे. काही विशेष लोकल फेऱ्या चालविण्यात येत असल्या, तरी त्यात केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी, बँक कर्मचारी, वकील तसेच सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. आता सर्वसामान्यांना लोकलसेवेची सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. राज्य सरकार लवकरच यासंबंधी निर्णय घेणार असल्याचे संकेत मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. दरम्यान, सर्वसामान्यांसाठी लोकलसेवा अद्याप बंद असल्यामुळे रस्ता वाहतुकीवर ताण येत आहे. परिणामी मुंबईतील पश्चिम उपनगर, शीव, वांद्रे, कल्याण-शिळफाटा, पूर्व द्रुतगती महामार्ग, दहिसर, घोडबंदर, ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर येथे कायमच वाहतूक कोंडी होते. अनेक ठिकाणी रस्ते, पुलांची कामे सुरू आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here