म. टा. वृत्तसेवा,
वाशीतील घाऊक बाजारात आता विविध देशातील कांद्याची आवक होण्यास सुरुवात झाली असून इराण, इराकपाठोपाठ अफगाणिस्तानचा कांदा दाखल झाला आहे. या परदेशी कांद्याच्या येण्याने भाववाढीला लगाम लागला असून देशी ५० ते ६५ रुपये किलो झाले आहेत. तर परदेशी कांद्याचे दर ४० ते ४५ रुपये किलोवर आले आहेत.

पावसामुळे देशी कांद्याचे ५० टक्के नुकसान झाले असून पुढच्या काळात कांद्याची टंचाई भासणार आहे. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी मागवायला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी पहिल्यांदा इराणचा कांदा बाजारात दाखल झाला. त्यापाठोपाठ इराक, आणि आता अफगाणिस्तानचा कांदा बाजारात आला आहे. कांद्याची बाजारातील पुढची मागणी पूर्ण करण्यासाठी येत्या काळात आणखी परदेशी कांदा काही व्यापाऱ्यांनी मागवला आहे. परदेशातून येणारा हा कांदा समुद्रामार्गे येत असल्याने १५ ते १८ दिवस जातात. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत आणखी परदेशी कांदा बाजारात येण्याची शक्यता आहे.

हा परदेशी कांदा बाजारात येत असल्याने हॉटेल व्यावसायिकांकडून कांद्याला असलेली मागणी पूर्ण होत आहे .त्यामुळे काही प्रमाणात कांद्याची कमतरता भरून निघत आहे. कांद्याच्या वाढत्या दराला लगाम लागला असून अगदी ८० रुपये किलोपर्यंत गेलेले कांद्याचे दर घाऊक बाजारात ६० ते ६५ रुपये किलोवर आले आहेत. त्यामुळे कांद्याचे दर उतरले असून दरवाढ थांबली आहे, अशी माहिती कांद्याचे व्यापारी मनोहर तोतलानी यांनी दिली आहे. पुढचे दोन आठवडे तरी कांद्याचे दर वाढणार नसल्याचे चित्र बाजारात आहे. परदेशी कांदा बाजारात येत असल्याने आत्ता पुन्हा कांद्याची रोजची आवक ७० ते ८० गाड्यांवर आली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here