म. टा. प्रतिनिधी, नागपूरः ‘नागरिकत्व केवळ लोकांच्या अधिकारांपुरते मर्यादित नसून समाजाप्रती असलेल्या कर्तव्यांचाही त्यात अंतर्भाव आहे’, असे महत्त्वपूर्ण मत शरद बोबडे यांनी आज व्यक्त केले. राष्ट्रसंत नागपूर विद्यापीठाच्या १०७ व्या दीक्षांत सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सरन्यायाधीश बोबडे बोलत होते. देशात सध्या नागरिकत्व कायद्यावरून काहूर माजलेले असताना नागरिकत्वाची सरन्यायाधीशांनी केलेली व्याख्या महत्त्वाची मानली जात आहे.

सरन्यायाधीशांनी यावेळी शिक्षणक्षेत्राच्या विदारक स्थितीवरही कोरडे ओढले. गेल्या काही वर्षांमध्ये शैक्षणिक संस्था प्रचंड व्यावसायिक झाल्या आहेत. शिक्षणाच्या या बाजारीकरणाचा अनुभव मी स्वत: घेतला आहे, असे नमूद करत विद्यापीठ ही केवळ दगड, मातीची इमारत नव्हे, तसेच एखादे उत्पादन निर्माण करणारा कारखानादेखील ठरू नये, अशी अपेक्षा सरन्यायाधीश बोबडे यांनी व्यक्त केली.

बोबडे म्हणाले की, विद्यापीठीय शिक्षणाचा नेमका अर्थ आणि फायदा समजून घेण्याची गरज आहे. विद्यापीठांनी केवळ चार भिंतीच्या इमारतीप्रमाणे उभे राहणे वा प्रॉडक्शन युनिटप्रमाणे कार्य करणे अपेक्षित नाही. विद्यापीठीय अभ्यासक्रमांमध्ये सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची क्षमता असायला हवी. विद्यापीठाने स्वत:ला काळानुरूप अद्ययावत करायला हवेत. ज्याप्रमाणे शिक्षकांचे ओरिएंटेशन प्रोग्राम होतात, त्याचप्रमाणे विद्यापीठाचे व्हायला हवे, असे मत बोबडे यांनी व्यक्त केले.

दीक्षांत सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. सिद्धार्थ विनायक काणे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी, परीक्षा नियंत्रक डॉ. राजू हिवसे, विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राधिकरण सदस्य उपस्थित होते.

विद्यार्थ्यांमध्ये संताप वाढतोय…

देशभरातील एकूण स्थिती पाहता विद्यार्थ्यांमध्ये संताप, चीड, असंतोषाचे वातावरण वाढत आहे. त्यांना फसविले जात असल्याची भावना दिसून येत आहे. मुळात शिक्षण ही संकल्पना शिस्त या संकल्पनेशी पूरक अशी आहे. शिस्त नसेल तर शिक्षण होऊ शकत नाही. त्यामुळे या प्रकाराच्या संतापाची वास्तविक पाहता तीळमात्र गरज नाही, असे म्हणत बोबडे यांनी अप्रत्यक्षरित्या विद्यार्थ्यांच्या विद्यमान स्थितीवर भाष्य केले.

हुशारीसोबतच चारित्र्यही आवश्यक

विद्यार्थी केवळ हुशार असून भागत नाही. हुशारीला चारित्र्याची जोड मिळायला हवी. पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्याने त्याच्याकडून समाजाला असलेल्या अपेक्षा जाणून घ्यायला हव्यात. केवळ स्वातंत्र्य महत्त्वाचे नसून एकमेकांवर अवलंबून राहात विकास साधणेदेखील जरुरी असल्याचे बोबडे म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here