सुनील नलावडे, रत्नागिरी

ग्रंथालयचालकांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकार लवकरच घेणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी सांगितले. नव्या ग्रंथालयांना मान्यता देण्यावर बंदी घालण्याचा निर्णय तत्कालीन राज्य सरकारने सन २०१२ मध्ये घेतला. हा निर्णय बदलून नव्या ग्रंथालयांना मान्यता देणे सुरू करण्यात येईल, असे सामंत म्हणाले.

मालगुंड येथे कवी केशवसुत स्मारक सभागृहात आयोजित अखिल भारतीय मराठी विज्ञान संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी सामंत बोलत होते. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. संमेलनाचे अध्यक्ष डॉ. हेमचंद्र प्रधान, स्वागताध्यक्ष मधु मंगेश कर्णिक, कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठराज जोशी, रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप साळवी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. सन २०१२ मध्ये एका निर्णयाद्वारे नव्या ग्रंथालयांना मान्यता देणे बंद करण्यात आले आहे. मात्र नव्या ग्रंथालयांना मान्यता देण्याचे काम पुन्हा सुरू करण्यात येईल, अशी घोषणा उदय सामंत यांनी या संमेलनाच्या निमित्ताने केली.

‘कोकण ही बुद्धिवंतांची भूमी आहे. या भूमीने अनेक भारतरत्ने दिली. अशा या भूमीचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो’, असे खासदार विनायक राऊत यांनी आपल्या भाषणात सांगितले.

तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात विविध चर्चासत्रे आणि व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी दुपारच्या सत्रात ‘उच्च शिक्षणातील संधी’ या विषयावर अध्यक्ष डॉ. हेमचंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्र पार पडले. सायंकालीन सत्रात प्रा. रेखा सिंघल यांचे ‘काजू, आंबा, फणस यांची उपयोगिता’ या विषयावर व्याख्यान झाले. त्यानंतर मधु मंगेश कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली कविता वाचनाचा कार्यक्रम झाला. आज, रविवारी ‘उद्योगधंदे व भविष्यातील संधी’ या विषयावर चर्चासत्र होणार आहे. उद्या, सोमवारी अखेरच्या दिवशी जयगड बंदर व कातळशिल्पे यांना भेट देऊन त्यांचा अभ्यास करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here