म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

मुंबईत केमिस्ट, दवाखाने याबरोबर आता हॉटेल्स, मॉल, दुकाने २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबत सर्वसामान्यांतून संमिश्र प्रतिक्रिया येत असल्या तरी याचा भार पोलिस यंत्रणेवर पडणार आहे. रात्रभर आस्थापना चालू राहिल्यास त्याचा परिणाम कायदा आणि सुवव्यस्थेवर पडण्याची शक्यता असल्याने दिवसाप्रमाणेच पोलिसांनी रात्रीही मनुष्यबळ कार्यरत ठेवावे लागणार आहे.

मुंबईत विहित वेळेपेक्षा उशिरापर्यंत दुकाने अगर इतर आस्थापना सुरू असल्यास तसेच याबाबत पोलिसांकडे तक्रार आल्यास मुंबई पोलिस कायद्यान्वये दंडात्मक कारवाई केली जाते. तसेच यासंदर्भात संबंधित आस्थापनावर पुढील कारवाईसाठी पालिका आणि इतर परवानगी देणाऱ्या यंत्रणेला कळविले जाते. मात्र आता २४ तास आस्थापना सुरू राहिल्यास पोलिसांना कारवाई करता येणार नाही. दुसरीकडे त्यांच्यावरील बंदोबस्त, गस्त याचा ताण मात्र वाढणार आहे. दिवसापेक्षा जवळपास निम्म्यापेक्षा कमी मनुष्यबळ रात्री पोलिस ठाण्यांत कार्यरत असते. मात्र २४ तास दुकाने सुरू ठेवल्यास नागरिकांची मुंबईच्या रस्त्यावरील रहदारी रात्रीही कायम असेल. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचे मनुष्यबळही आवश्यक आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी महिलांच्या सुरक्षेचा महत्त्वाचा प्रश्न आहे. रात्रीच्या वेळी वर्दळ वाढणार असल्याने स्ट्रीट क्राइम (रस्त्यावरील गुन्हेगारी) वाढण्याची भीती आहे. त्यातच एखादा गुन्हा घडल्यास अंधारात सीसीटीव्ही फुटेजची स्पष्टता कमी येत असल्याने आरोपींना शोधण्यातही अडचणी येऊ शकतात. मुंबई पोलिस दलामध्ये अधिकारी आणि कर्मचारी यांची कमतरता असतानाच दिवसाप्रमाणे रात्रीही मनुष्यबळ ऑनड्युटी ठेवावे लागणार आहे.

मनुष्यबळ वाढवण्याची गरज
मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्याने अंतर्गत गुन्हेगारीबरोबरच देशविघातक प्रवृत्तींकडून शहराला नेहमीच धोका असतो. त्यातच मुंबईत सर्वच धार्मिक सण मोठ्या प्रमाणात साजरे होत होतात. राज्य सरकारचे मुख्यालय तसेच मंत्री, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, महत्त्वाच्या इमारती मुंबईत अधिक संख्येने आहे. मोर्चे, आंदोलने मुंबईत वारंवार सुरू असतात. लोकसंख्या भरमसाठ वाढत असताना तुलनेने कमी असलेल्या मनुष्यबळात मुंबई पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था टिकवावी लागते व गुन्हे नियंत्रणात ठेवावे लागतात. त्यातच आता २४ तास मुंबई सुरू ठेवायची असल्यास मुंबई पोलिस दलातील मनुष्यबळ वाढविण्याची गरज असल्याचे मत अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here