पिसादेवी रोड परिसरातील वृद्धेला सुरवातीला सर्दी, पडसे झाले. डॉक्टरांकडे दाखवून आणल्यानंतर तिला बरे वाटले, पण तीन दिवसांनी खोकला सुरू झाला, दम लालू लागला. एक्स-रे आणि सिटीस्कॅन केल्यानंतर आजींनी करोना असल्याचे स्पष्ट झाले. त्यावेळी म्हणजे ३ सप्टेंबर रोजी शहरात कुठेही आयसीयू बेड उपलब्ध नव्हता. लगेचच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले व संबंधित वृद्धेची ऑक्सिजनची गरज सतत वाढत गेली. दुसऱ्याच दिवशी तिला आयसीयूमध्ये हलवावे लागले. तिच्यावर दिवस-रात्र उपचार सुरू होते, पण तिची प्रकृती खालावत होती. तब्बल २५ दिवस व्हेंटिलेटरवर उपचार झाल्यानंतर तिची प्रकृती काहीशी सुधारली आणि त्यानंतरही सुमारे २५ दिवस वृद्धेला वॉर्डात ठेवावे लागले. हळूहळू प्रकृती सुधारत गेली आणि यशस्वी उपचारानंतर दसऱ्याच्या एक दिवस आधी संबंधित वृद्धेला सुटी देण्यात आली. संबंधित रुग्णासाठी हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमने प्रयत्न केले आणि ते प्रयत्न फळाला आले, असे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर व सुपरस्पेशालिटीचे विशेष कार्य अधिकारी डॉ. सुधीर चौधऱी यांनी कळवले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times