पंजाबमधील औष्णिक वीज प्रकल्पांना कोळशाचा पुरवठा इतर राज्यांमधून केला जातो. हा कोळसा घेऊन मालगाड्या पंजाबमध्ये जातात. पण गेल्या काही दिवसांपासून मालगाड्यांची वाहतूक पूर्णपणे बंद आहे. पण प्रवासी गाड्यांची वाहतूक होत असेल तरच आंदोलन करू. मालगाड्यांच्या वाहतुकीला आमचा विरोधना नाही. मालगाड्या आडवल्या जाणार नाहीत, असं शेतकरी संघटनांचं म्हणणं आहे.
मालगाड्या आणि रेल्वे रुळांच्या सुरक्षेची हमी पंजाब सरकार घेत असेल तरच मालगाड्या पंजाबला पाठवल्या जातील, असं केंद्र सरकारने म्हटलं आहे. पंजाब आणि केंद्र सरकारच्या या लढाईत आता पंजाबवर अंधारात जाण्याची भीती आहे.
भटिंडामधील तलवंडी साबो हा पंजाबचा सर्वात मोठा औष्णिक वीज प्रकल्प आहे. येथून २ हजार मेगावॅट वीज निर्मिती होते. पतियाळाचा नाभामध्ये १४०० मेगावॅटचा प्रकल्प आहे. कोळशाचा अखंड पुरवठा होत नसल्यामुळे पंजाबमधील काही औष्णिक वीज प्रकल्पांकडे केवळ १ ते २ दिवसांचा कोळसा शिल्लक आहे. यामुळे येत्या काही दिवसांत पंजाबमध्ये वीज कपात वाढेल आणि राज्य अंधारात जाण्याचा धोका आहे. सध्या दोन मोठे औष्णिक वीज प्रकल्प बंद झाले आहेत आणि तीन छोट्या औष्णिक वीज प्रकल्पांकडे फक्त १ ते २ दिवसांचा कोळसा शिल्लक आहे.
पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात पीएसपीसीएल सध्या नॅशनल ग्रीड आणि इतर राज्यांमधून वीज खरेदी करून राज्यातील वीजेची मागणीची पूर्तता करत आहे. पण ही वीज खरेदी करण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या नॅशनल ग्रीड व अन्य राज्यांना आगाऊ पैसे द्यावे लागतील.
‘केंद्र सरकार बदला घेतंय’
या संपूर्ण प्रकरणावर शेतकरी नेत्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. शेतकरी रेल्वे रुळावर बसलेले नाहीत किंवा मालवाहतुकीवर रोखण्याचा कोणताही प्रयत्न करणार नाहीत. पण असं असूनही केंद्र सरकार जाणीवपूर्वक पंजाबमधील शेतकरी आणि जनतेवर सूडबुद्धीने कारवाई करत आहे आणि हेतूपूर्वक मालगाड्या पंजाबला पाठवल्या जात नाहीए जेणेकरुन पंजाबमधील शेतकरी आणि जनता त्रस्त होईल, असा आरोप शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी केला आहे. रेल्वे रूळ आणि मालगाड्यांचे कुठलेही नुकसान करणार नाही, असा शब्द शेतकरी संघटनांनी पंजाब सरकारलाही दिला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times