यजमान भारत आणि ऑस्ट्रेलिया या तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांमध्ये रविवारी वनडे मालिकेतील निर्णायक तिसरा सामना होणार आहे. एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये हा सामना होईल. गेल्यावर्षी जानेवारीत ऑस्ट्रेलियात भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिका २-१ ने जिंकली होती, त्यानंतर भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धची वनडे मालिका पिछाडी भरून काढत ३-२ अशी जिंकली होती. आता सलग दुसऱ्यांदा भारतात वनडे मालिका जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ उत्सुक आहे, तर दुसरीकडे गेल्या दोन वनडे मालिकांत वेस्ट इंडिजविरुद्ध बाजी मारणारा भारतीय संघ सलग तिसरी वनडे मालिका जिंकण्यासाठी उत्सुक आहे.
मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने एकतर्फी विजय नोंदविला होता. त्यानंतर राजकोटला झालेल्या सामन्यात भारताने चोख प्रत्युत्तर दिले आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. पहिल्या सामन्यातील अपयशानंतर भारतीय संघाने राजकोटला खेळ उंचावला. पहिल्या वनडेत तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या लोकेश राहुलला राजकोट वनडेत पाचव्या क्रमांकावर पाठविण्यात आले. या संधीचे राहुलने सोने केले. त्याने दीडशेहून अधिकच्या स्ट्राइक रेटने ८० धावा केल्या. पंतच्या अनुपस्थितीत राहुलने यष्टीरक्षण केले होते. त्याने फिंचला यष्टिचीत केले; तसेच दोन झेलही घेतले. कर्णधार विराट कोहलीही आपल्या नेहमीच्या तिसऱ्या क्रमांकावर आला होता. त्यानेही ७८ धावांची खेळी केली. श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर आला होता. रविवारीही असाच क्रम पाहायला मिळण्याची शक्यता आहे. रोहितला शुक्रवारी क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. मात्र, निर्णायक तिसऱ्या लढतीसाठी रोहित उपलब्ध असेल, असा विश्वास कोहलीने व्यक्त केला. शिखरलाही कमिन्सचा चेंडू लागला होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हटले की, ‘शिखर आणि रोहित हे दुखापतीतून उत्तमरीत्या सावरत आहेत. त्यावर लक्ष ठेवून आहोत. अखेरच्या वन-डेमधील त्यांच्या सहभागाबाबत सामन्याच्या आधी निर्णय घेतला जाईल.’
गोलंदाजीत बदलाची शक्यता नाही. भारतीय संघ तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकीपटूंसह मैदानात उतरू शकते. गेल्या वर्षी कुलदीप यादवल म्हणावी अशी कामगिरी करता आली नव्हती. मात्र, गेल्या सामन्यात कुलदीपने एका षटकात अॅलेक्स कॅरी आणि स्टीव स्मिथ यांना बाद करून सामन्याचे चित्र पालटले होते. कुलदीपसोबत युझवेंद्र चहलला संधी मिळण्याची शक्यता आहे. ‘आयपीएल’मध्ये चिन्नास्वामी स्टेडियम हे युझवेंद्र चहलचे होम ग्राउंड आहे. दुखापतीतून सावरून पुनरागमन करणारा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने गेल्या सामन्यात सुरेख मारा केला होता. हे भारताच्या दृष्टीने सकारात्मक आहे. त्याने एका बाजूने दडपण वाढविले आणि दुसऱ्या बाजूने विकेट मिळाल्या. शमी आणि नवदीप सैनी यांनी अखेरच्या टप्प्यात चांगली गोलंदाजी केली.
दुसरीकडे, पराभवानंतर ऑस्ट्रेलियात फार बदलाची शक्यता नाही. गेल्या सामन्यात कुलदीपच्या षटकात दोन विकेट गमावण्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघ चांगल्या स्थितीत होता. मार्नस लबुशेनने वनडेतील पहिल्या खेळीत चांगली कामगिरी केली. गोलंदाजीत गेल्या सामन्यात मिचेल स्टार्कने १० षटकांत ७८ धावा दिल्या होत्या. कामगिरी सुधारण्यासाठी स्टार्क उत्सुक असेल. त्यासोबत पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर धावा करणे सोपे नसेल. याशिवाय अॅडम झाम्पा पुन्हा एकदा विराट कोहलीची विकेट घेणार का, हे पाहणेही औत्सुक्याचे आहे. यापूर्वी, वनडेत झॅम्पाने विराटला पाच वेळा बाद केले आहे. दुसरा फिरकीपटू अॅश्टन एगरला मात्र प्रभाव पाडता आलेला नाही. निर्णायक लढतीत संधी मिळाल्यास त्याला खेळ उंचवावा लागणार आहे.
खेळ आकड्यांचा…
४
चिन्नास्वामी स्टेडियममध्ये भारत-ऑस्ट्रेलिया हे संघ आतापर्यंत वनडेमध्ये सातवेळा आमनेसामने आले. त्यात चार लढती भारताने, तर दोन लढती ऑस्ट्रेलियाने जिंकल्या. तसेच, एका लढतीवर पावसाने पाणी फेरले होते.
३८३
चिन्नास्वामी स्टेडियममध्ये २०१३मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ६ बाद ३८३ धावा केल्या होत्या. ही भारताची ऑस्ट्रेलियाविरुद्धची वन-डेतील सर्वोच्च धावसंख्या आहे.
३४७
चिन्नास्वामी स्टेडियममध्ये २००३मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध २ बाद ३४७ धावा केल्या होत्या. ही या स्टेडियममधील भारताविरुद्धची ऑस्ट्रेलियाची वनडेतील सर्वोच्च धावसंख्या आहे.
१०
भारत-ऑस्ट्रेलिया या संघांत भारतात होत असलेली ही दहावी वन-डे मालिका असून, त्यात पाच वेळा ऑस्ट्रेलियाने, तर चारवेळा भारताने मालिका जिंकली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Thank you for great content. Hello Administ.Click on the Keyword to Enter the Website. Canlı Casino Siteleri