मुंबई : रुग्णाला उपलब्ध करून देणे ही रुग्णालयाची जबाबदारी असते. मात्र केईएम रुग्णालयामध्ये डायलेसिससाठी दाखल असलेल्या एका रुग्णाला रक्त मिळावे, यासाठी वणवण करणाऱ्या त्याच्या आईचे हाल पाहून त्या रुग्णाने स्वतःच रक्त उपलब्ध करण्यासाठी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. रुग्णालयाबाहेर पडून चार तासांनंतर तो रक्त घेऊन पुन्हा रुग्णालयात आला. मात्र एवढ्या काळात तो खाटेवर का नव्हता, कुठे आणि का गेला होता, याबद्दल रुग्णालयातील एकाही कर्मचाऱ्याने तिथे बसलेल्या त्याच्या आईकडे साधी विचारणाही केली नाही. टीबी रुग्णालयातील घटना ताजी असताना उघड झालेल्या या प्रकारामुळे रुग्णालयातील अंतर्गत व्यवस्थेविषयी अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या तरुण मुलाला ११ ऑक्टोबर रोजी प्रकृती अस्वास्थ्यामुळे शताब्दी रुग्णालयातून केईएममध्ये दाखल करण्यात आले. वॉर्ड क्रमांक २१मध्ये दाखल असलेल्या या रुग्णाचे हिमोग्लोबिन अतिशय कमी होते, त्यामुळे त्याला तातडीने रक्ताची गरज होती. मात्र तीन दिवस रक्त उपलब्ध न झाल्यामुळे डायलेसिसही होऊ शकले नाही.

आरोग्य कार्यकर्ते राहुल साळवे यांनी या रुग्णासाठी उपलब्ध केल्यानंतरही, रक्तपेढीने हा दाता स्वीकारला नाही. उलट रक्त आणले नाही, तर रुग्णालयात थांबता येणार नाही, असा भावनिक दबाव आणला. या रुग्णाच्या आईला कमी ऐकू येते. मुलाला रक्त मिळावे, यासाठी या आईने गोवंडी येथील रक्तपेढीमध्ये जाऊन रक्त आणण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी मुंबईमध्ये कधीही प्रवास न केल्यामुळे त्यांना ही रक्तपेढी शोधता आली नाही. असहाय अवस्थेमध्ये त्या केईएममध्ये परतल्या. आईची ही फरपट आणि रक्तासाठी सतत होणाऱ्या विचारणेमुळे अस्वस्थ झालेल्या या रुग्णाने प्रकृती खालावलेली असतानाही स्वत: गोवंडी येथील रक्तपेढीमध्ये जाऊन रक्त आणण्याचा निर्णय घेतला. रुग्णालयाबाहेर जाताना त्याने ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांना त्याची कल्पनाही दिली. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

गोवंडी येथील रक्तपेढीतून आणलेले रक्तही त्यानेच शीतकपाटामध्ये ठेवले व त्याचीही माहिती तेथील वैद्यकीय तज्ज्ञांना दिली. २७ ऑक्टोबरला संध्याकाळी ६.३० ते रात्री १०.३० या वेळेमध्ये हा रुग्ण केईएमममध्ये त्याच्या वॉर्डमध्ये, जागेवर नव्हता. मात्र या कालावधीमध्ये रुग्ण कुठे गेला, याची साधी विचारणाही संबधित विभागातील परिचारिका, डॉक्टरांनी तिथे बसलेल्या त्याच्या आईकडे केली नाही. बाहेरून आत येणाऱ्या व्यक्तींची कसून चौकशी होत असताना, रुग्णालयातून रुग्ण बाहेर जाणाऱ्या रुग्णाची चौकशी का केली नाही, आधीच हिमोग्लोबीन कमी असलेल्या या रुग्णाच्या आरोग्याच्या काही तक्रारी या कालावधीत निर्माण झाल्या असत्या, तर त्याची जबाबदारी कुणाची, असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.

ही जबाबदारी कुणाची?

रक्तपेढीबाहेर लावण्यात आलेले दूरध्वनी क्रमांक लागत नाहीत. त्यामुळे रक्तासाठी कुठे जायचे, हा प्रश्न रुग्णांना सतावतो. यासंदर्भात रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी रक्तदात्याचा स्वीकार न करण्याचे नेमके कारण पाहावे लागेल, असे सांगितले. तसेच कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना दाखल करताना रुग्णालयातून कपडे देणे बंद केल्याने साध्या पोशाखातील रुग्ण बाहेर गेला, तर तो लक्षात न येण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली.

रुग्णाला जेव्हा ओ पॉझिटिव्ह रक्त चढवण्यात आले, त्या दिवशी, २८ ऑक्टोबर रोजी रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये या रक्तगटाच्या दोन पिशव्या रक्त उपलब्ध होते. रक्त उपलब्ध असतानाही ते रुग्णाला ते का देण्यात आले नाही, असा सवालही उभा राहिला आहे. ई-कोषावर किती रक्त उपलब्ध आहे, याची माहिती देणे बंधनकारक असताना, ही माहिती केईएमच्या रक्तपेढीमधून क्वचित अपलोड केली जाते, ही बाबही समोर आली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here