म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष यांच्या हत्येप्रकरणात अंबरनाथमधील एका बांधकाम व्यावसायिकाचा हात असल्याचा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे. तर बांधकाम साइटवर साहित्य पुरवण्यासंबंधी डी. मोहन आणि राकेश पाटील यांच्यातील वादातून ही झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आले असून मुख्य आरोपी डी. मोहन आणि भरत पाटील यांच्या मागावर पोलिस आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या हत्येने शहरात तणाव निर्माण झाला आहे.

अबरनाथमध्ये शिवसेनेचे नगरसेवक पप्पू गुंजाळ यांची २०१५मध्ये हत्या झाली होती. त्यानंतर राजकीय हत्यासत्र थांबले होते. मात्र उल्हासनगर मनविसेचे शहराध्यक्ष मनोज शेलार यांच्यावर गोविंद पूल परिसरात काही दिवसांपूर्वी तलवारीने हल्ला झाला होता. ही घटना ताजी असतानाच अंबरनाथ गाव शिवमंदिर परिसरात राहणारे मनसेचे शहर उपाध्यक्ष राकेश पाटील यांच्यावर मंगळवारी भररस्त्यात पाच ते सहा आरोपींनी तलवारीने वार करून त्यांची हत्या केली. या हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. मात्र वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय धुमाळ यांनी आरोपींच्या वाहनांचा पाठलाग करत मुरबाड आणि आजूबाजूच्या भागात नाकाबंदी केली आणि विनायक पिल्ले, राजू दाजी, अजय दाजी, अख्तर खान या आरोपींना मुरबाड पोलिसांच्या साह्याने अटक केली. यातील मुख्य आरोपी डी. मोहन आणि भरत पाटील हे फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी अंबरनाथ येथे भेट देऊन एका बिल्डरवर हत्येचा आरोप केला. या बिल्डरच्या इमारतीत पाणी साचत असल्याने तेथे घरे न घेण्याचे आवाहन राकेश यांनी नागरिकांना केले होते. यामुळे दसऱ्याच्या दिवशी गृहखरेदीवर परिणाम झाल्याच्या रागातून या बिल्डरने ही हत्या केल्याचा आरोप जाधव यांनी केला. मात्र या बांधकाम साहित्य पुरवण्यावरून झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here