म. टा. खास प्रतिनिधी, : सोने-चांदी खरेदीसाठी दुचाकीवरून आलेल्या सराफाकडील पैशांची बँग चोरट्यांनी हातोहात लंपास करून पोबारा केल्याची धक्कादायक घटना सराफ बाजारातील मारुती मंदिर परिसरात घडली. यामुळे सराफ व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. या पिशवीत तब्बल २० लाख रुपयांची रोकड होती. पाळत ठेवून अथवा पाठलाग करून चोरट्यांनी डल्ला मारल्याची शक्यता असून, या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरत मधूकर पवार (रा. मेरी) यांनी या प्रकरणी तक्रार दिली. पवार यांचे औद्योगिक वसाहतीतील अशोकनगर भागात सराफी पेढी आहे. दुकानासाठी लागणारे सोने व चांदी खरेदीसाठी ते नेहमीच सराफ बाजारात येत असतात. गुरुवारी (दि. २९) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ते सोने चांदी खरेदीसाठी सराफ बाजारात आले असता, ही घटना घडली. पवार नेहमीप्रमाणे पैशांची पिशवी दुचाकीच्या पाठीमागील कॅरियरला बांधून घेवून आले होते. मारुती मंदिर परिसरात ते मोटारसायकलवरून प्रवास करीत असताना गर्दीतील पादचारी चोरट्यांनी रोकडवर डल्ला मारला. पवार यांना काही कळण्यापूर्वीच बांधलेली पिशवी चोरट्यांनी सोडून नेली. ही बाब लक्षात येताच पवार यांनी सरकारवाडा पोलिसांशी संपर्क साधला. वरिष्ठ निरीक्षक हेमंत सोमवंशी यांच्या फौजफाट्याने घटनास्थळ गाठून चोरट्यांचा माग काढला. मात्र, रात्री उशिरापर्यंत चोरटे हाती लागले नव्हते.

तिघांचा समावेश?

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी मोहीम हाती घेतली. मात्र, रात्री उशिरापर्यंत हा तपास सुरू होता. सूत्रांच्या माहितीनुसार यात किमान तीन जणांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. सराफी व्यावसायिक पवार नेहमी याच पद्धतीने पैसे घेवून बाजारात येतात. त्यामुळे चोरट्यांनी पाळत ठेवून अथवा पाठलाग करून हे कृत्य केल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

भर गर्दीतील घटना

सणाच्या पार्श्वभूमीवर एम.जी. रोड, सराफ बाजार या भागात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी आहे. सांयकाळी तर खरेदीसाठी झुंबड उडालेली होती. या गर्दीचा फायदा चोरट्यांनी घेतला. महिलांच्या पर्सवर डल्ले मारण्याचे प्रकार या भागात नेहमीच होतात. मात्र, २० लाखांची रोकड लंपास झाल्याने गुन्हेगारांचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here