म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड: मॉडेलिंगमध्ये करिअरच्या भूलथापा देत एकाने गुंगीचे औषध देऊन वेळोवेळी अत्याचार करून व अश्लील व्हिडीओ काढून व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेकडून पैसे व सोन्याचे दागिनेही लुबाडल्याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

वडनेर दुमाला येथील तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार २०१२ मध्ये ती बारावीत असताना वडनेर गेट येथील संस्थेमध्ये मॉडेलिंग ट्रेनिंगसाठी जात होती. तेथे एकाने विकी शर्मा असे नाव सांगत मॉडेलिंगमध्ये चांगली ओळख असल्याचे सांगत मॉडेलिंगचे ट्रेनिंग सुरू केले. मॉडेलिंगसाठी फोटो शूट करण्यासाठी तो तिला बाहेर घेऊन जाऊ लागला. ऑगस्ट २०१२ मध्ये फोटो शूटचे कारण सांगून पीडितेस घरी नेऊन कोल्ड ड्रिंक्समधून गुंगीचे औषध दिले. तिची शुद्ध हरपल्यावर तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. नंतर शस्त्राचा धाक दाखवून घरच्यांसह मारून टाकण्याची धमकी दिली. तिचे अश्लील फोटो व व्हिडीओ काढून पोलिसांत तक्रार केल्यास ते व्हायरल करण्याची धमकी दिली.

संबंधिताचे नाव विकी शर्मा नसून, आफताब मन्नन शेख असल्याचे तरुणीला नंतर समजले. मोठ्या बहिणीचे लग्न झाले होते, तर दुसऱ्या बहिणीचे लग्न ठरल्याने पीडित तरुणी गप्प बसली. मात्र, संशयित आफताबने व्हिडीओ, फोटो व्हायरल करेन, घरच्यांना ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार सुरूच ठेवले. तिच्याकडून आठ लाख रुपये, सोन्याचे दागिने घेतले. तिची शैक्षणिक कागदपत्रे, पॅन, आधार कार्ड, वाहन परवाना, एटीएम कार्ड, पासपोर्ट आदीदेखील घेतले. ऑगस्ट २०१२ ते फेब्रुवारी २०२० पर्यंत आफताबने अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here