म. टा. प्रतिनिधी, : नवजात अर्भकाची हत्या केल्याप्रकरणी आरोपी महिलेला प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीपाद टेकाळे यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात ब्राह्मणी (ता. कन्नड) येथील पोलिस पाटील राजू नागलोद यांनी कन्नड शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

गावातील एक तरुण चंदन शेवाळे याने २४ ऑक्टोबर २०१८ रोजी सकाळी त्यांना माहिती दिली, की गावातील उकीरड्यावर गोणपाटाच्या पिशवीत एक नवजात अर्भक फेकण्यात आलेले आहे. त्यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहिले असता, गोणपाटाच्या पिशवीत प्राण्यांनी पायाचे लचके तोडलेल्या अवस्थेत एक अर्भक आढळून आले. पोलिसांनी येऊन पंचनामा केला आणि मृत अर्भक ताब्यात घेतले. प्रकरणात गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास करून आरोपी महिला कुसूमबाई सोनावणे हिला ताब्यात घेतले.

ती एकटीच राहायची. २४ ऑक्टोबर २०१८ला तिने बाळाला जन्म दिला. मात्र, ही बाब गावकऱ्यांपासून लपविण्याकरिता तिने या नवजात अर्भकाच्या डोक्याला जखम करून त्याला गोणपाटाच्या पिशवीत ठेवले आणि ती उकीरड्यावर फेकून दिले. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली. तिच्या विरोधात भादंवि ३१४ कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी महिला कारागृहातच आहे. पोलिसांनी तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे अनिल शेवाळे यांनी दहा साक्षीदार तपासले. दोन्ही बाजूचा युक्तिवाद, साक्ष आणि पुरावे तसेच डीएनए रिपोर्टच्या आधारे आरोपी कुसूमबाईविरोधात गुन्हा सिद्ध झाल्याने तिला भादंवि ३०२ कलमान्वये , ५०० रुपये दंड, दंड न दिल्यास १५ दिवस सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here