मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज शुक्रवारी सलग २८ व्या दिवशी इंधन दर जैसे थेच ठेवले. त्यामुळे आज मुंबईत पेट्रोल ८७.७४ रुपये आणि डिझेल ७६.८६ रुपये प्रती लीटर कायम आहे. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८१.०६ रुपये असून ७०.४६ रुपयांवर कायम आहे. चेन्नईत पेट्रोल ८४.१४ रुपये असून डिझेल ७५.९५ रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोल ८२.५९ रुपये आहे. डिझेलचा भाव ७३.९९ रुपये प्रती लीटर झाले आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ऑइल कंपनीने सप्टेंबरमध्ये डिझेल दरात २.९३ रुपयांची कपात केली होती. तर पेट्रोल ९७ पैशांनी कमी झाले होते. त्याशिवाय सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी (रेशनिंग) केरोसीन दरात २.१९ रुपयांची कपात केली. १ ऑक्टोबरपासून मुंबईत केरोसीनचा दर प्रती लीटर २३.६५ रुपये झाला. त्याआधी तो २५.८४ रुपये होता.

जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होत आहे. मात्र देशांतर्गत इंधन दर तीन आठवड्यांहून अधिक काळ स्थिर असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आज शुक्रवारी सलग २८ व्या दिवशी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केला नाही. तीन आठवड्यांहून अधिक काळ इंधन दर ‘जैसे थे’च आहेत. युरोपीयन देशांमध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर करण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे. मागील काही दिवसांमध्ये ब्रिटन, फ्रान्ससह इतर देशांमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. फ्रान्समध्ये एकाच दिवसात ३३ हजार ४१७ जणांना करोनाची बाधा झाली असल्याचे समोर आले आहे.

साथीचा आजार बळावल्यामुळे डब्ल्यूटीआय क्रूडचे दर ५.५ टक्के अशा वेगाने घसरले व ३७.४ डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले. युरोप आणि अमेरिकेतील रुग्णसंख्या वाढल्याने तेलाच्या अर्थकारणावर नकारात्मक परिणाम झाला. अमेरिका आणि रशियात कोव्हिड-१९ चे रुग्ण वाढल्यामुळे तेलाच्या किंमती घसरल्या. युरोपियन देशांत विषाणूमुळे नवे निर्बंध लादले गेल्याने जागतिक आर्थिक सुधारणेची गती आणखी कमी होऊ शकते व त्यामुळे तेलाचे दरही आणखी घसरू शकतात.

अमेरिकेच्या क्रूड साठ्यात ४.४ दशलक्ष बॅरलची वृद्धी झाल्याचे अमेरिकन एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनने नोंदवले. मागील आठवड्यात अमेरिकेचे क्रूड उत्पादन मागील तीन महिन्यातील सर्वोच्च पातळीवर झाले. त्यामुळे तेलाच्या दरात पुन्हा घट दिसून आली. झेटा चक्रिवादळामुळे मेक्सिकोच्या आखातात तेल उत्पादन बंद होते. त्यामुळे मागील व्यापारी सत्रात तेलाचे दर काहीसे वाढले होते. तथापि, वाढीव तेल पुरवठा आणि जागतिक मागणीतील घट यामुळे या स्थितीचा लाभ तेल बाजाराला फारसा झाला नाही व दरात आणखी घसरण दिसून आली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here