जालना: अनैतिक संबंधांवरून विधवा सूनेची आणि तिच्या प्रियकराची सासऱ्याने आणि दिराने ट्रॅक्टरखाली चिरडून हत्या केल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यात घडली. या प्रकरणी सासऱ्यासह दिराला अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी चापडगाव येथील बथवेल लालझरे आणि विकास लालझरे यांना गुरुवारी अटक केली. अंबड पोलिसांनी ही माहिती दिली. मारिया आणि भागवत हरबक अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, ३२ वर्षीय मारियाच्या पतीचे १० वर्षांपूर्वी निधन झाले होते. ती सासरीच राहते. तिचे भागवत हरबक या तरुणासोबत होते. भागवत हा देखील याच गावात राहत होता.

या दोघांच्या प्रेमसंबंधांना तिच्या सासऱ्याचा तीव्र विरोध होता. यावरून लालझरे याने भागवतला धमकीही दिली होती. भागवत याने यानंतर अंबड पोलीस ठाण्यात लालझरे आणि त्याच्या मुलाविरोधात तक्रार दिली होती. त्यांच्यापासून जीवाला धोका असल्याचेही त्याने तक्रारीत म्हटले होते. मार्चमध्ये भागवत आणि मारिया हे दोघे पळून गेले होते. ते गुजरातला गेल्याची माहिती मिळाली होती. महिला बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

२२ एप्रिल रोजी पोलिसांनी त्या दोघांना गुजरातहून परत आणले होते. त्यानंतर ते दोघे गावात एकत्र राहत होते. २८ ऑक्टोबर रोजी मारिया आणि भागवत हे दोघे जवळच्या गावात एका मेळाव्यासाठी मोटरसायकलवरून जात होते. त्यावेळी लालझरे याने त्याच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली आणि त्या दोघांना ट्रॅक्टरखाली चिरडले, अशी माहितीही पोलिसांनी दिली. या दोघांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात घेऊन जात असताना, त्यांचा मृत्यू झाला. लालझरे पिता-पुत्राने मारिया आणि भागवत या दोघांची हत्या केल्याचा आरोप भागवतच्या पत्नीने केला. पोलिसांनी बथवेल आणि विकास लालझरे या दोघांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here