आज शुक्रवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. सोन्याचा भाव ४६३ रुपयांनी वधारला असून तो प्रती १० ग्रॅम ५०७४५ रुपयांवर गेला आहे. चांदीच्या दरात देखील ७२८ रुपयांची वाढ झाली आहे. एक किलो चांदीचा भाव ६०९०० रुपये आहे.
goodreturns.in या वेबसाईटनुसार शुक्रवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४९८९० रुपये आहे. तर २४ कॅरेटचा भाव ५०८९० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेटचा भाव ४९००० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५२४५० रुपये आहे. कोलकात्यात ग्राहकांना २२ कॅरेट सोने खरेदीसाठी ४८९०० रुपये मोजावे लागत आहेत. तर २४ कॅरेटचा भाव ५२५१० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेट सोने प्रती १० ग्रॅमसाठी ४७३४० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी तो ५१६४० रुपये आहे.
अमेरिकेकडून अतिरिक्त मदतीची चिन्हे दिसत नसल्याने सोने १.५ टक्क्यांनी घसरले व ते १८७७.१ डॉलर प्रति औसांवर स्थिरावले. या स्थितीमुळे डॉलरला आधार मिळाला व इतर चलनधारकांसाठी या मौल्यवान धातूचे आकर्षण कमी झाले. डेमोक्रेट्ससोबत अनेक चर्चा अपयशी झाल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी अखेरीस मदत निधीसाठी परवानगी दिली, मात्र त्यावर नोव्हेंबर २०२० च्या निवडणुकांनंतर अंमलबजावणी होईल. करोना साथीच्या नव्या लाटेने युरोपमध्ये पुन्हा निर्बंध लादले व युरोचे मूल्य घसरले. त्यामुळे अमेरिकेचे चलनमूल्य वधारले. जगात कोरोना रुग्णांचे प्रमाण धोकादायक पातळीवर वाढल्यानंतर जागतिक अर्थकारणावर दबाव आला. त्यामुळे गुंतवणूकदारांनी अमेरिकी डॉलरअंतर्गत आश्रय घेतला.
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नोव्हेंबर २०२० च्या निवडणुकांनंतर मदतनिधीचे निवेदन करणार असल्याचे वक्तव्य केल्यानंतर डॉलरला आधार मिळाला आणि सोन्याचे मूल्य कमी झाले. आजच्या सत्रात एमसीएक्सवर सोन्याचे दर घसरण्याची शक्यता आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times