बँक ऑफ बडोदाने चालू खाते, कॅश क्रेडीट लिमीट आणि ओव्हरड्राफ्ट खात्यातून पैसे काढणे किंवा काढण्यासाठी शुल्क निश्चित केले आहे. एका महिन्यात तीन वेळा व्यवहार केल्यांनतर त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहारावर १५० रुपयांच्या शुल्काचा भार ग्राहकांना सोसावा लागणार आहे.
बचत खातेदारांना देखील या शुल्काचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. बचत खात्यातून पैसे काढणे किंवा जमा करण्यासाठी शुल्क वसूल केले जाणार आहे. एका महिन्यात तीन बँक व्यवहार निशुल्क असतील. त्यानंतर पैसे जमा करण्यासाठी एका वेळी ४० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. तर पैसे काढण्यासाठी १०० रुपये द्यावे लागणार आहेत.
या शुल्क वसुलीचा ज्येष्ठ नागरिकांना देखील फटका बसणार आहे. जनधन खातेधारकांना पैसे जमा करणे निशुल्क असले तरी पैसे काढण्यासाठी मात्र त्यांना १०० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. एक नोव्हेंबरपासून हा नियम लागू होणार आहे.
कॅश क्रेडीट, करंट अकाउंट आणि ओव्हरड्राफ्ट खातेधारकांना दररोज एक लाख रुपये जमा करण्यास मुभा असेल. यावर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. मात्र एक लाखांहून अधिक रक्कम जमा केल्यास त्यावर शुल्क आकारले जाणार आहे. त्यापुढील प्रत्येक एक हजार रुपयांवर एक रुपया शुल्क आकारले जाईल.
बचत खातेधारकांप्रमाणेच कॅश क्रेडीट, करंट अकाउंट आणि ओव्हरड्राफ्ट खातेधारकांना एका महिन्यात तीन व्यवहार नि:शुल्क असतील. त्यानंतर प्रत्येक व्यवहारावर १५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. बँक आॅफ बडोदापाठोपाठ बॅंक आॅफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, अॅक्सिस बँक, सेंट्रल बँक या बँकांनी असे शुल्क लागू करण्याचे संकेत दिले आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times