म. टा. प्रतिनिधी,

‘गर्दीच्या वेळी मुंबई लोकलमध्ये मुंगी शिरायलाही जागा नसते’, असे मुंबईकर मिश्किलपणे सांगतात. एरव्ही करोनापूर्व स्थितीत प्रवासात हीच जागा मिळवायला मुंबईकरांना कसरत करावी लागत होती. मात्र आता ही जागा उपलब्ध असेल तरच तिकीट मिळेल,या धर्तीवर चालणारे मुंबई लोकलसाठी वापरण्याच्या हालचाली राज्य सरकारकडून सुरू आहेत.

‘करोनाकाळात कोलकाता मेट्रोने नागरिकांना प्रवासमुभा देण्यापूर्वी मोबाइल अॅप विकसित केले. प्रवाशांना हे अॅप मोफत देण्यात आले. या अॅपमध्ये सर्व मेट्रोच्या फेऱ्यांचे वेळापत्रक होते. प्रवाशांना मेट्रोमधून प्रवास करायचा असल्यास प्रवासाचा तपशील भरणे आवश्यक करण्यात आले. यात मेट्रोची वेळ, स्थानके यांचा समावेश केला. तपशील भरल्यानंतर संबंधित मेट्रोमध्ये प्रवाशांची ‘जागा’ आरक्षित होते. हे आरक्षित झालेले तिकीट अथवा जागेचा तपशील मेट्रो स्थानकांवर दाखवून संबंधित मेट्रोचे तिकीट घेऊनच प्रवाशांचा प्रवास सुरू होईल, अशा पद्धतीने कोलकाता मेट्रोचे अॅप काम करत असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.

अगदी याच प्रकारे सामान्य मुंबईकरांसाठी लोकल प्रवास सुरू होण्याची दाट शक्यता आहे. मुंबई लोकलच्या सर्व वेळा, थांबे यांचा समावेश राज्य सरकारकडून उपलब्ध करण्यात येणाऱ्या अॅपमध्ये असणार आहे. मुंबईकरांनी प्रवासाचा तपशील भरल्यावर सर्वप्रथम लोकलमधील ‘जागा’ आरक्षित होईल. जागेच्या तपशीलानंतर स्थानकांवर तिकीट उपलब्ध होईल, असे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.

विशेष म्हणजे कोलकाता मेट्रोने करोना संसर्ग टाळण्यासाठी अॅपमध्येच सुरक्षित वावरप्रमाणे मर्यादित प्रवाशांनाच जागा आरक्षित होईल, अशी व्यवस्था केली आहे. दरम्यान, सुरक्षित वावराच्या नियमानुसार लोकलमध्ये जागा आरक्षित झाली नाही तर मुंबईकरांना थेट प्रवासच नाकारला जाण्याची भीती या अॅपमुळे निर्माण होत आहे.

‘कोलकाता मेट्रोसाठी सॉफ्टवेअर विकसित केलेल्या कंपनीलाच आम्ही संपर्क केला आहे. करोनाकाळात गर्दीवर नियंत्रण राखण्यासाठी हे उपाय करण्यात येत आहेत’, असे राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी मुंबई उच्च न्यायालयात सांगितले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here