म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि नाशिककरांनी केलेल्या प्रयत्नांना मोठे यश येत आहे. करोनासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती आल्यामुळे शहरासह जिल्ह्यात करोनामुक्तीचा वेग वाढला आहे. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९३.४४ टक्क्यांवर पोहचले असून, नाशिक शहरातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तब्बल ९४.४५ टक्क्यांवर पोहचले आहे. राज्याचा करोनामुक्तीचा वेग ८९.६९ टक्के इतका असल्याने रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात नाशिक शहर व जिल्हा राज्यात अव्वल ठरले आहे.

मुंबई, पुण्यानंतर रुग्णवाढीमुळे राज्यात आघाडीवर असलेल्या नाशिकमधील करोनाची स्थिती आता आटोक्यात येत आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यांच्या मानाने ऑक्टोबरमध्ये करोना उतरणीला आला असून, रुग्ण बरे होण्यासह करोनाबळींचा दरही घटला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ९३ हजार ९९ करोनाबाधित आढळले असून, त्यातील ८६ हजार ९९४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत ४ हजार ४४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महापालिका क्षेत्रात २ हजार ५६१, मालेगाव महापालिका क्षेत्रात १०९, तर जिल्ह्याबाहेरील ३१ असे एकूण ४ हजार ४४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहर आणि जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही १० हजारापर्यंत पोहचली आहे. परंतु, आता करोना जोर ओसरल्यामुळे ती दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. राज्यात नाशिकमधील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे सर्वाधिक आहे. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये ९१.२० टक्के, नाशिक शहरात ९४.४५ टक्के, मालेगावमध्ये ९३.३४ टक्के, तर जिल्हाबाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९०.२५ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९३.४४ इतके आहे. राज्याचा एकूण रुग्ण बरे होण्याचा दर हा ८९.६९ टक्के एवढा आहे.

७१.५३ अहवाल निगेटिव्ह

नाशिक जिल्हा रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात ज्याप्रमाणे आघाडीवर आहे, त्याप्रमाणेच सरासरी करोना टेस्टमध्येदेखील नाशिक राज्यात आघाडीवर आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख २९ हजार ९४७ लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. यात करोना पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण २८.१२ टक्के आहे. निगेटिव्हचे प्रमाण हे ७१.५३ टक्के एवढे आहे. सध्या ११६५ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. एकूणच जास्तीच्या चाचण्यांमुळे नाशिकमधील करोनाची स्थिती झटपट नियंत्रणात येत असल्याचे चित्र असल्याने नाशिकला मोठा दिलासा मिळाला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here