करोनाचे संकट आले, त्यावेळी सुरवातीच्या काळात मात्र नगरमध्ये प्रमाण कमी होते. नंतर ते वाढत गेले. मधल्या काळात कहरच झाला होता. नव्याने आढळणारे रुग्ण आणि मृत्यूंची संख्याही वाढली होती. रुग्णालयात बेड मिळणेही अनेकदा कठीण होत होते. त्यामुळे चिंता वाढली होती. दररोज हजारपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळत होते. मृत्यूंचे प्रमाणही दोन अंकी होते.
आता मात्र गेल्या दहा दिवसांपासून लक्षणीय घसरण सुरू झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ५६ हजार ८२ रुग्ण आढळून आले. त्यातील ५३ हजार ८४६ रुग्ण बरे झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१ टक्के आहे. ८६१ जणांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात अवघे १८२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. सध्या १,३७५ रुग्णांवर उपाचार सुरू आहेत. अनेक कोविड सेंटर बंद होत आहेत. रुग्णालयांतील खाटाही रिकाम्या होत आहेत. तरीही माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम प्रभावीपणे राबवत चाचण्यांची संख्या वाढविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिल्या आहेत.
दिवाळीच्या तोंडावर ही दिलासादायक स्थिती समोर आली आहे. मात्र, याचा अंदाज जिल्ह्याचे पालकमंत्री मुश्रीफ यांनी जुलै महिन्यातच वर्तविला होता. जुलैमध्ये संगमनेर तालुक्यात करोनाचा कहर सुरू होता. त्यावेळी मुश्रीफ संगमनेरच्या दौऱ्यावर आले होते. तेथे बोलताना त्यावेळी ते म्हणाले होते, ‘करोनाचा प्रादूर्भाव सध्या वाढतोय, हे खरे आहे. तरीही आता पुन्हा लॉकडाऊन करण्याचा अजिबात विचार नाही. यापुढे करोनासोबतच जगावे लागेल, मात्र लोकांनी आजार अंगावर काढू नये, लक्षणे दिसताच कोविड सेंटरला यावे. नोव्हेंबरअखेरपर्यंत हे सर्व संपुष्टात येईल.’
त्यांच्या या विधानाची प्रचिती आता नगरच नव्हे तर राज्यभरात येत आहे. राज्यातील करोनाचे प्रमाणही लक्षणीयरित्या कमी झाले आहे. उद्यापासून नोव्हेंबरची सुरवात होत असताना नगरसह सर्वत्र करोनाचे आकडे बरेच खाली आलेले आहेत. त्यामुळेच मुश्रीफ यांच्या या विधानाची आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. नगरला पुन्हा लॉकडाउन न करण्याच्या निर्णयावर पालकमंत्री आणि प्रशासन ठाम राहिले. काही लोकप्रतिनिंधीनी यासंबंधीची मागणी लावून धरली होती. तरीही पुन्हा लॉकडाउन करण्यात आला नाहीच.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times