अहमदनगर: मराठी भाषा आणि अस्मितेचा अवमान करणाऱ्या जान कुमार सानूला याला केवळ माफीवर सोडू नये. त्याच्यावर आयुष्यभर लक्षात राहील अशी कारवाई करावी, मात्र अनेक कलाकार आणि कामगारांचे भवितव्य अवलंबून असलेला संबंधित शो बंद पाडू नये, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या चित्रपट कामगार आघाडीतर्फे करण्यात आली आहे.

आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. सुरजकुमार पिल्ले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्याकडे ही मागणी केली आहे. भाजपच्या चित्रपट कामगार आघाडीने यासंबंधी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले आहे की, याने मराठीचा जो अपमान केला, त्याचा आघाडीतर्फे तीव्र निषेध करण्यात येत आहे. सरकार आणि संयोजकांनी या स्पर्धकावर कडक कारवाई करावी, अन्यथा आमच्या संघटनेतर्फे सनदीशीर मार्गाने लढा दिला जाईल. अर्थात यामुळे हा शो बंद पडावा, अशी आमची भूमिका नाही. करोनाच्या संकटानंतर आता कुठे असे शो सुरू झाले आहेत. यावर हजारो कलावंत आणि कामगारांचे भवितव्य अवलंबून आहे. एका अविचारी स्पर्धकामुळे शो बंद पडून इतरांवर उपासमारीची वेळ येऊ नये. एका नासक्या आंब्यामुळे संपूर्ण पेटी फेकून देणे हस्यास्पद होईल. असा विरोध करण्यास भाजप चित्रपट कामगार आघाडी इच्छुक नाही. ही संघटना चित्रपट, मालिका, नाट्य क्षेत्रातील कलाकार आणि कामगार यांच्या न्याय हक्कासाठी काम करणारी संघटना आहे. जान सानू याच्यावर राज्य सरकार आणि संबंधित शो आयोजक कंपनी यांनी आयुष्यभर लक्षात राहील अशी कारवाई करावी. कारण मराठी भाषा ही आमच्यासाठी केवळ भाषा नसून आमची अस्मिता, आमचा श्वास आहे. त्यामुळे जान सानू सारख्या अपप्रवृत्तींना शिक्षा झालीच पाहिजे. फक्त माफी मागितली म्हणजे झाले असे नाही. जर महाराष्ट्रात राहायचे असेल तर ज्या पद्धतीने आमची संघटना प्रत्येक प्रांत, भाषा आणि व्यक्तीचा यथोचित सन्मान करते, तसाच इतरांनी सुद्धा केला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे जान सानूविरूद्ध कारवाई झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे, असेही संघटनेने म्हटले आहे.

आणखी वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here