दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते आज, ‘केजरीवाल गॅरंटी कार्ड’ प्रसिद्ध करण्यात आला. दिल्लीकरांना देण्यात येणाऱ्या मोफत सुविधा या पुढील पाच वर्षे कायम राहतील असं आश्वासन त्यांनी दिलं. यावेळी त्यांनी नवी आश्वासनंही दिली. पाच वर्षांत दिल्लीला उजळून टाकू, असंही ते म्हणाले. आधीपासूनच लागू असलेल्या योजना यापुढेही सुरू राहतील आणि काही योजना या पुढील पाच वर्षात पूर्ण करण्यात येतील, असं केजरीवाल म्हणाले. यावेळी त्यांनी वीज, पाणी, शिक्षण, दळणवळण, वसाहती, यमुना आदी मुद्द्यांवर भाष्य केलं.
‘यमुनेत डुबकी मारणार’
‘पुढील पाच वर्षांत यमुना स्वच्छ करण्यात येईल. पाच वर्षे लागतील. मात्र, तुम्ही एकदा तरी यमुनेत डुबकी मारणार,’ असं आश्वासनही केजरीवाल यांनी यावेळी दिलं.
आश्वासनांचा पाऊस
कच्च्या वसाहतींमध्ये राहणाऱ्यांसाठी त्यांनी नव्या घोषणा केल्या. रस्ते, नाले, गल्लीबोळ, पाणी, मोहल्ला क्लिनिक, सीसीटीव्ही कॅमेरे आदी आश्वासनं त्यांनी दिली. वीजेच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी महत्वाची घोषणा केली. पुढील पाच वर्षे २०० यूनिटपर्यंत मोफत वीज देण्यात येईल. २४ तास वीज देण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. २० हजार लिटर पाणी मोफत देण्यात येईल. पाच वर्षांत प्रत्येक घरात शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येईल. पदवीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी दिल्ली सरकारवर राहील. नवीन मोहल्ला क्लिनिक आणि रुग्णालये सुरू करण्यात येतील. महिलांना यापुढील काळातही बसमधून मोफत प्रवास करता येईल.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times