म. टा. प्रतिनिधी, सांगली: सांगलीतील वसंतदादा मार्केट यार्डातील व्यापाऱ्यास चाकूचा धाक दाखवून १० लाख ७९ हजार रुपयांची रक्कम लुटणाऱ्या टोळीला पोलिसांनी अवघ्या दीड तासात जेरबंद केले. हा प्रकार शनिवारी रात्री दहाच्या सुमारास घडला. या प्रकरणी सांगलीचे शहर उपअधीक्षक अजित टिके यांच्या पथकाने लुटारूंच्या टोळीचा म्होरक्या गजेंद्र इसरडे (वय ३८, रा. नवीन वसाहत, संजय गांधी झोपडपट्टी, ) याच्यासह चौघांना मार्केट यार्ड परिसरात सापळा रचून अटक केली.

पोलीस उपअधीक्षक टिके यांनी दिलेल्या माहितीनुसार, गजेंद्र इसरडे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. मोक्कांतर्गत सात वर्षांचा कारावास भोगून काही महिन्यांपूर्वीच तो बाहेर आला आहे. तुरुंगातून बाहेर येताच त्याने पुन्हा गुन्हेगारी कृत्यांना सुरुवात केली आहे. तीन साथीदारांना सोबत घेऊन त्याने शनिवारी रात्री मार्केट यार्ड परिसरात व्यापाऱ्यांना लुटण्याचा कट रचला. रात्री पावणेनऊच्या सुमारास त्याने एका व्यापाऱ्यास चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील १० लाख ७९ हजार रुपयांची रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेतली. यानंतर मार्केट यार्ड परिसरातील एका इमारतीच्या छतावर हे चौघे लपून बसले होते. गुन्हा घडल्यानंतर १५ मिनिटात पोलिसांना याची माहिती मिळाली. शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी तातडीने मार्केट यार्ड परिसरात नाकाबंदी केली. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर लुटारू याच परिसरातील एका इमारतीत लपल्याचे लक्षात आले.

लुटारू लपून बसलेल्या इमारतीच्या सभोवती पोलिसांनी घेराव घातला. बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद केले. काही पोलिसांनी बाजूच्या इमारतींवर जाऊन लुटारूंना शरण येण्याचे आवाहन केले. मात्र, पोलिसांना धमकावत त्यांनी स्वतःच्या जिवाचे बरेवाईट करून घेण्याची भीती दाखवली. उपअधीक्षक टिके यांनी इमारतीच्या छतावर जाऊन टोळीच्या म्होरक्याला जेरबंद केले. या टोळीकडून पोलिसांनी लुटीतील १० लाख ७९ हजार रुपयांसह दोन चाकू आणि एक कोयता जप्त केला. यांच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोक्कातून सुटताच पुन्हा गुन्हे

गजेंद्र इसरडे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर सांगलीत अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. सांगली पोलिसांनी मोक्कांतर्गत कारवाई केल्याने त्याला सात वर्षे कारावासाची शिक्षा झाली होती. शिक्षा भोगून तो नुकताच बाहेर आला आहे. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्याने पुन्हा नवी टोळी तयार करून गुन्हेगारी कृत्यांना सुरुवात केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here