मिरा रोड: २७ वर्षीय नवविवाहित महिलेने आपल्या पतीविरोधात मिरा रोडमधील नयानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. लग्नाच्या वेळी नवऱ्याने टक्कल असल्याचे आपल्यापासून लपवून फसवणूक केल्याचे तिचे म्हणणे आहे. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नयानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी सप्टेंबरमध्ये आरोपी आणि महिलेचे लग्न झाले होते. आपल्या पतीचे टक्कल असून, ते लपवण्यासाठी तो विग वापरत असल्याचे तिला काही दिवसांनी समजले. तिने याबाबत आपल्या सासू-सासऱ्यांकडे विचारणा केली. तुमच्या मुलाचे टक्कल असून, लग्नाच्या वेळी तुम्ही ही बाब माझ्यापासून लपवली आणि माझी फसवणूक केली, असे तिने सासू-सासऱ्यांना सांगितले. यानंतर तिने थेट नयानगर पोलीस गाठले आणि पती आणि सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दिली.

याशिवाय, सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी छळ होत असल्याचेही तिने तक्रारीत म्हटले आहे. पती माझ्या चारित्र्यावर संशय घेत असून, पतीकडून मोबाइल तपासला जातो. तसेच तो अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवण्यासाठी बळजबरी करतो, असेही तिने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती आणि त्याच्या पालकांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ठाणे न्यायालयाने पतीचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला असून, त्याला पोलिसांसमोर हजर होण्यास सांगितले आहे. तर इतर आरोपींना अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here