म.टा. प्रतिनिधी, धायरीः आंबेगाव बुद्रुक येथे पालिकेने नव्याने कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला असून यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी रविवारी आंबेगाव बुद्रुक आंबेगाव खुर्द व जांभूळवाडी येथील नागरिकांच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. याचवेळी काही नागरिकांनी कचरा प्रकल्पालाचा आग लावल्यामुळे एकच गोंधळ उडाला. त्याचबरोबर यावेळी लावण्यासोबत येथील कार्यालयाची तोडफोड देखील करण्यात आली आहे.

यावेळी कात्रज, सन सिटी आणि कोंढवा बुद्रुक अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. यावेळी अग्निशमन दलाच्या ८ फायरगाङ्या व टॅंकर घटनास्थळी असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी भारती विद्यापीठ पोलीस दाखल झाले असून आग कोणी लावली याचा शोध पोलीस घेत आहेत. या ठिकाणी कचऱ्याचे ३० ते ३५ फूट कचऱ्याचे ढीग असल्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी जेसीबी, पोकलेन यांची मदत घेण्यात येत आहे. कचरा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी बराच कालावधी लागण्याची शक्यता अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

आंबेगाव बुद्रुक सर्व्हे नं. ५० मधील ४० गुंठे आरक्षित जागेवर १०० टन क्षमतेचा हा कचरा प्रक्रिया प्रकल्प बेकायदेशीरपणे उभारण्यात आला आहे. यामुळे आंबेगावचे वातावरण दूषित होऊन जांभूळवाडी तलाव, नैसर्गिक स्वच्छ पाण्याचे स्त्रोत, बोरिंग आणि विहिरीचे पाणी दूषित होऊन निसर्गाचा ऱ्हास होत आहे. अनेक लहान लहान बैठी घरे व उंच सोसायट्यामधील नागरिकांना गेल्या कित्येक दिवसापासून दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या कचरा प्रकल्पमध्ये येवलेवाडी, कोंढवा, बिबवेवाडी, सिंहगड रस्ता, धनकवडी आदी परिसरातून कचरा आणला जात असल्याने आंबेगाव बुद्रुक आंबेगाव खुर्द व जांभूळवाडी येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

या कचरा प्रकल्पाला विरोध करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी रविवारी सकाळी बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी कायद्याचा आधार घेऊन हा कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद करण्याच्या दृष्टिकोनातून कचरा प्रक्रिया प्रकल्प विरोधी कृती समिती स्थापन करण्याच्या निर्धार आंबेगावचे प्रथम नगरसेवक शंकरराव बेलदरे पाटील यांनी केला. यावेळी नगरसेविका अश्विनी पोकळे, नगरसेवक युवराज बेलदरे, माजी सरपंच संतोष ताठे यांच्यासह, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व सर्व सोसायट्यांमधील नागरिक यांनी पाठिंबा देऊन लवकरात लवकर हा कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद करण्याचा निश्चय केला होता.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here