म.टा. प्रतिनिधी, नगरः ग्रामीण भागातील यात्रांमधून होईक म्हणजे पुढील वर्षी घडणाऱ्या घडामोडींचे भाकित सांगण्याची प्रथा आहे. यातील किती खरे होते, याला आधार काय आणि यावर किती विश्वास ठेवायचा, हा ज्याचा त्याचा प्रश्न. मात्र, ग्रामीण भागातील लोक अद्यापही मोठ्या उत्सुकतेने हे होईक ऐकतात. केवळ गाव शिवाराच नव्हे तर देशविदेशातील संभाव्य घडामोडींचेही भाकीत अनेक ठिकाणच्या होईकांतून केले जाते.

नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील बिरोबा देवस्थानच्या होईकाचा कार्यक्रम रविवारी झाला. देवाचे पुजारी (भगत) नामदेव भुसारे यांनी होईक सांगताना देशात मोठी चळवळ होईल, करोनाचे संकट आणखी आठ महिने राहील आणि दाही खंडात रक्तपात होईल, असे भाकित केले. त्याची आता चर्चा सुरू झाली आहे.
होईक ऐकण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी हजेरी लावली होती. प्रथेप्रमाणे पशुहत्या बंदीचे पालन करुन देवाला भाजी-भाकरीचा नैवद्य दाखविण्यात आला. देवाचे भगत भुसारे यांनी अंगावर वेताचे फटके ओढून होईक सांगितले. गेल्यावर्षी त्यांना मोठ्या रोगराईचे भाकित केले होते. ते हेच करोनाचे संकट होते, अशी चर्चा ग्रामस्थ करीत होते.

पुढील वर्षाचे होईक सांगताना भुसारे म्हणाले, ‘’दाही खंडामध्ये रक्ताचा पूर वाहणार. बाया न्हात्यान, धुत्यान व पालखीत मिरत्याल. लक्ष्मीला पिडा नसून, बाळाला संकट आहे. दिवाळीच दिपान पाच ते सात दिवस आभाळ येऊन काही ठिकाणी पाऊस पडल. सटीच सटवान पाच ते सात दिवस फिरुन कर्मभागी पाऊस होईल. गायी देठाला लागून, नव तूप होणार. दिनमान (ग्रहण) काळा होईल. कपाशीला ७ ते ९ हजार क्विंटल, सोन्याला ४० ते ५४ हजार रुपये तोळा, ज्वारी २५०० ते २७०० पर्यंतचा पुढील वर्षासाठी भाव मिळंल. गहू, हरभर्‍यावर तांबारा रोग. आषाढी कठिण जाईल व मुगराळ्याची पेर होऊन घडमोड होईल. ज्वारी, गहू व हरभार्‍याची पेर होऊन काही हसतेन काही रडतेन,’’ असे कृषी विषयक होईकासोबत त्यांनी राष्ट्रीय-आंतरराष्टीय घडामोडींचे भाकितही केले.

देशात मोठी चळवळ होईल. दाही खंडात रक्तपात होईल. याचा अर्थ युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल असा घेतला जात आहे. रोगराईचे सध्याचे संकट आणखी आठ महिने राहणार असल्याचे सांगत करोनाचा मुक्काम लांबणार असल्याचाच जणू अंदाज वर्तविल्याचे गावकरी सांगत आहेत. खास ग्राम्य भाषेत सांगितल्या जाणाऱ्या या होईकाचा अर्थ ग्रामस्थांना समाजावून घ्यावा लागतो. काही ठिकाणी लिहून ठेवलेल्या ग्रंथाचे एक एक पान दरवर्षी वाचले जाते, तर कोठे अंगात देवाचा संचार झाल्याचे सांगणारे पुजारीच होईक सांगतात.

निमगावमधील होईक ऐकण्यासाठी नगर शहर, निमगाव वाघा, चास, पिंपळगाव वाघा, जखनगांव, हिंगणगाव, नेप्ती, हिवरे बाजार, निंबळक, इसळक, खारेकर्जुने पंचक्रोशीतील भाविकांनी हजेरी लावली होती.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here