इंदूरः लॉकडाउनच्या काळात करोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या एका पालिका कर्मचाऱ्याला लोकांच्या टोमण्यांनी छळलं होतं. हे सहन झाल्यानं त्याने आत्महत्या केली. ही घटना मध्य प्रदेशातील इंदूर येथील सुभाष नगर भागातील आहे. रविवारी सकाळी या भागात एका पालिका कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला. त्याच्या तोंडातून फेस बाहेर येत होता. त्यानंतर कर्मचार्‍याने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचले. या ठिकाणी त्यांना आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली. ज्यात त्या कर्मचार्‍याने केलेल्या कठोर परिश्रमांची वेदना होती.

मृत कर्मचाऱ्याचे नाव जितेंद्र यादव होते. ते सुभाष नगर पाण्याच्या टाकीवर व्हॉल्व्ह मॅन म्हणून काम करत होते. पोलिसांना कर्मचाऱ्याची आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी मिळाली आहे. करोना काळातील लॉकडाउन दरम्यान अनेकांना मदत केली आहे. असं असूनही, काही जण त्यांना तुच्छ लेखण्याचा प्रयत्न करत होते. यामुळे त्यांना जगण्याची इच्छा राहिली नाही. आपल्याला जे तुच्छ समजत होते, परमेश्वर त्यांनाही सुखी ठेवो, असं त्यांनी चिठ्ठीत लिहिलंय.

पालिका कर्मचाऱ्याची आत्महत्या

मृत व्यक्ती नैराश्यात गेली होती आणि लॉकडाउनमुळे केलेल्या परिश्रमांचं फळ त्याला मिळालं नाही. अशा स्थितीत विष पिऊन त्याने आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मृत व्यक्तीचे कुटुंब काही कार्यक्रमासाठी ग्वाल्हेरला गेले होते आणि मृत जितेंद्र यादव काल रात्रीपासून बेपत्ता होते. त्याचवेळी, मृत्यूपूर्वी ते रात्री २ वाजता मित्राशी बर्‍याच वेळा बोलल्याची माहितीही पोलिसांना मिळाली आहे. करोना कालावधीत आपण अनेक कामं केली आहेत. पण त्याचं काही फळ मिळालं नाही, असं मृत जितेंद्र यादव यांनी चिठ्ठीत लिहिलंय.

पोलीस तपास सुरू

पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. करोना योद्ध्याने अशा प्रकारे आयुष्याचा शेवट केल्याने हळहळ व्यक्त होतेय. दुसरीकडे जितेंद्र यादव यांना त्रास देणारे आता पोलिसांच्या रडारवर आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here