‌म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

करोनाचा संसर्ग झाल्यानंतर रुग्णाच्या कुटुंबीयांचा धीर खचतो. एकट्याल्या काळजी केंद्रामध्ये जावे लागत असल्याने रुग्णही अस्वस्थ होतो. मात्र, घरापासून दूर असलेल्या रुग्णांना दिलासा देणारी घटना गोरेगावमधील करोना काळजी केंद्रात रविवारी घडली. या लक्षात ठेवून केंद्रातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी साजरा करून त्याचा दिवस संस्मरणीय केला.

मालाड येथे राहणाऱ्या जयदीप अंगोलकर यांना करोना झाल्यामुळे उपचारासाठी त्यांना नेस्को केंद्रामध्ये दाखल करण्यात आले. जयदीप यांची करोनाचाचणी पॉझिटिव्ह आल्याचे कळताच घरात रडारड सुरू झाली. पण, पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना धीर दिला. वॉररूमच्या माध्यमातून खाटेची उपलब्धता करण्यात आली. पहिल्या दिवशी जयदीप यांना येथे येणारे रुग्ण हताश, घाबरलेले आणि करोना झाला म्हणजे आता पुढे काय होणार? या भीतीने त्रस्त असल्याचे जाणवले. जयदीप यांनी त्यांना धीर द्यायला सुरुवात केली, हिंमत ढळू देऊ नका. नेस्कोमधील सर्व वैद्यकीय व्यवस्था उत्तम आहे. तुम्हाला काहीही होणार नाही. घाबरू नका, असे सांगून ते त्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी मदत करीत होते. जयदीप सांगतात, ‘पालिकेच्या या केंद्रांविषयी अनेकांनी आरोपप्रत्यारोपांची राळ उडवली. मात्र, इथे रुग्णांची कुटुंबीयांप्रमाणे काळजी घेतली जाते. काही ठिकाणी त्रुटी असतील, पण या सकारात्मक बाबीही आहेत. दिवसांतून तीन वेळा डॉक्टरांकडून पाहणी, ऑक्सिजनची पातळी मोजणे, औषधोपचार, आहारावर भर अशा तऱ्हेने येथे काळजी घेतली जाते. रुग्णांमध्ये सकारात्मक भावना वाढावी यासाठी काही कार्यक्रमही येथे घेतले जातात.

जयदीप यांचा रविवारी वाढदिवस होता. या दिवशी कुटुंबीयांसोबत राहता यावे, यासाठी त्यांनी घरी जाण्याची विनंती केंद्रातील डॉक्टरांकडे केली होती. या दिवसाची आवर्जून आठवण ठेवून डॉक्टर आणि इथल्या कर्मचाऱ्यांनी जयदीप यांच्यासाठी खास केक मागवला होता. केक कापून त्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला. जयदीप म्हणाले की, ‘मटा’कडून शुभेच्छांचा स्वीकार करतानाच, हा वाढदिवस त्यांना आयुष्यभर लक्षात राहील. पीपीई किटमध्ये अनेक डॉक्टरांचे, काळजी घेणाऱ्या परिचारिकांचे चेहरे दिसत नाहीत. ऐकू येतो, तो त्यांचा आश्वस्त करणारा आवाज. या कठीण काळामध्ये हे वैद्यकीय कर्मचारीही ताणतणावामध्ये आहेत. तरीही रुग्णांना आनंद मिळावा याासाठी त्यांची धडपड सुरू असते. आज जयदीप त्यांच्या कुटुंबीयासोबत वाढदिवस साजरा करत होते. करोनामुक्त होऊन घरी आल्यानंतर आयुष्याची अन् काळजी घेणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या रूपाने नव्या विस्तारित कुटुंबाची भेट मिळाल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here