मुंबई: गळ्यातून सोन्याची चेन खेचून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्याला तरुणीने जीवाची पर्वा न करता धावत्या बसमधून उडी मारून पकडले. हा चोरटा सोन्याची चेन चोरून रिक्षातून पळून जात होता. त्याचवेळी गस्तीवरील पोलिसांच्या मदतीने तिने चोरट्याला पकडले. मुंबईतील अंधेरी – कुर्ला रोडवरील येथे गेल्या शुक्रवारी सकाळी १० वाजता ही घटना घडली.

संजना बागुल (वय १९) असे या धाडसी तरुणीचे नाव आहे. ती डबल डेकर बसमधून प्रवास करत होती. बसमध्ये गर्दी होती. कुणीतरी आपल्या गळ्यातील सोन्याची चेन खेचत असल्याचे तिला जाणवले. त्याने चेन खेचून धावत्या बसमधून चकाला येथे उडी मारली. त्याचवेळी तरुणीने जीवाची पर्वा न करता धावत्या बसमधून उडी मारली आणि चोरट्याला पोलिसांच्या मदतीने पकडले. मुकेश गायकवाड (वय ३४) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चेन हस्तगत केली आहे.

संजना एका खासगी कंपनीत काम करते. ती कामावर निघाली होती. ती अंधेरी पूर्वेकडे बेस्ट बसमध्ये चढली. तिला कुर्ला येथे जायचे होते. चोरटा तिच्या गळ्यातील चेन खेचून पळून जात होता. तिने क्षणाचाही विचार न करता धावत्या बसमधून उडी मारली. तिने आरडाओरड केली. चकाला सिग्नलवर ड्युटीवर असलेल्या वाहतूक पोलिसाने त्याचा पाठलाग केला आणि त्याला पकडले, अशी माहिती अंधेरी पोलिसांनी दिली.

आरोपी गायकवाड हा बेरोजगार आहे. त्याने यापूर्वी अशा प्रकारचे काही गुन्हे केले आहेत का, याची माहिती पोलीस घेत आहेत. त्याला कोर्टात हजर केले असता, पोलीस कोठडी सुनावली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here