म.टा. प्रतिनिधी, नगर: ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर अनेक आजी-माजी आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. नगर जिल्ह्यातूनही काही माजी आमदार राष्ट्रवादीत जातील, अशी चर्चा आहे. त्यातही माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचे नाव घेतले जात आहे. त्यातच माजी मंत्री सुरेश धस यांनी नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात बोलताना, ‘कर्डिले हे सध्या आमच्या कमळात आहेत. पुढे सुद्धा कमळातच राहतील. सध्या ते बिलकुल बदल करण्याच्या मूडमध्ये नाहीत,’ असे वक्तव्य केले. तसेच सोडून जाण्यास आमच्यापैकी कोणीच तयार नाही, असे सांगतानाच आजी- माजी आमदारांबाबत सुरू असलेल्या पक्षांतराच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

नगर तालुक्यातील पारेवाडी येथे आयोजित कार्यक्रमासाठी माजी मंत्री आमदार सुरेश धस, माजी मंत्री शिवाजी कर्डिले व माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते हे एकत्र आले होते. यावेळी पाचपुते व कर्डिले यांनी धस यांचा ‘आमचे नेते’ म्हणून उल्लेख केला. मात्र हाच धागा पकडत धस यांनी आपल्या भाषणात चांगलीच फटकेबाजी केली. ते म्हणाले, ‘आमदार बबनराव पाचपुते व माजी मंत्री कर्डिले हे दोन्ही दिग्गज माणसे आहेत. ते मला म्हणाले ‘आमचे नेते’. परंतु मी यांचा नेता कसा होऊ शकतो? माझी यांच्या पायाच्या जवळ उभे राहण्याची सुद्धा योग्यता नाही. कारण पाचपुते हे नऊ वेळा निवडणूक लढले व सात वेळा जिंकले. विशेष म्हणजे त्यांची सात ही वेळा वेगवेगळी चिन्हे होती. राज्यात सलग अनेक जण निवडून आले. परंतु एवढ्या वेगवेगळ्या चिन्हावर निवडून येणारा महाराष्ट्रात कोणताही आमदार नसेल, ते एकमेव पाचपुते आहेत. त्यामुळे मी त्यांचा नेता कसा होईल? असा प्रश्न त्यांनी उपस्थित करताच श्रोत्यांमध्ये एकच हास्यकल्लोळ झाला.

यावेळी धस यांनी बोलताना कर्डिले यांचे देखील कौतुक करतानाच राज्यात सुरू झालेल्या पक्षांतराच्या चर्चेलाही पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले , ‘ मला कर्डीले नेते म्हणाले, पण ते चेष्टेने बोलले. खरे तर तेच माझे नेते आहेत, ही वस्तुस्थिती आहे. कर्डिले हे आमचे आयकॉन आहेत. आता राजकारणात काही गोष्टी मागेपुढे होत असतात. पहिल्यांदा त्यांच्या पदरी अपयश पडले आहे. ते सुद्धा सहा वेळा निवडणूक लढले, आणि पाच वेळा विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे त्यांची सुद्धा चिन्हे वेगळी राहिली आहेत. ते आता आमच्या कमळात आहेत, पुढे सुद्धा ते कमळातच राहतील. ते बिलकुल बदल करण्याच्या मूडमध्ये नाहीत, आणि आमच्यापैकी कोणीच नाही. कारण राज्यात एक चांगला नेता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने मिळाला व देशात आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या रूपाने एक खमक्या पंतप्रधान मिळाला आहे. त्यामुळे आता कोणीही पक्ष सोडण्याच्या मुडमधे नाही.’

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here