ठाण्यातील साठेनगरमध्ये राहणारा २० वर्षाचा तरुण वागळे इस्टेटमध्ये कॉलसेंटरमध्ये काम करतो. ३१ ऑक्टोबरला दुपारी कामावर असताना ओळखीच्या तरुणीचा त्याला फोन आला. या तरुणीने त्याला वसईला बोलावून घेतले. वसईला गेलेल्या तरुणाच्या बाबतीत वेगळाच प्रसंग घडला. तरुणीसह तिचा बाप मोहम्मद जावेद उर्फ नन्हे मददअली शेख तसेच मोहमद परवेज अब्दुल रहमान शेख, सबीना परवेज शेख, अमित अरुण पीरधनकर, अरुण पणीकर, लोकेश पुजारी या सात जणांनी संगनमत करुन तरुणाचे अपहरण केले. या तरुणाला गाडीतून मनोर महामार्गावर आणून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
नन्हे शेख याने तरुणाच्या भावाला फोन करून चार लाखांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास हत्या करण्याची धमकी दिली. तसेच त्याला मोहम्मद परवेज याच्या पूर्वेकडे असलेल्या न्यू केजीएन इमारतीमधील घरात डांबून ठेवले होते. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर अपहृत तरुणाचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन पथके तयार करण्यात आली. एक पथक विरार आणि दुसरे पथक मुंबईतील बांगूरनगरला रविवारी रात्री पाठवण्यात आली. दरम्यान, पोलिसांना मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी छापा टाकून घरात डांबून ठेवलेल्या तरुणाची अखेर अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका केली. तसेच तरुणीसह तिचा बाप आणि अन्य पाच आरोपी अशा एकूण सात आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या गुन्ह्यात वापरलेली कार पोलिसांनी जप्त केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता ढोले यांच्या पथकाने २४ तासांच्या आत या गुन्ह्याची उकल केली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times