काबूलः अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये सोमवारी दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला. काबूल विद्यापीठातील पुस्तक प्रदर्शात दाखल झालेल्या तीन दहशतवाद्यांनी विद्यार्थ्यांवर अंधाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात २० विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. ४० जखमी आहेत. सुरक्षा दलांनी तिन्ही हल्लेखोरांना ठार केल्याचं अफगाणिस्तानच्या गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितलं.

विद्यापीठाच्या उत्तर गेटवर झालेल्या स्फोटानंतर गोळीबार सुरू झाला. वृत्तवाहिन्यांवरील फुटेजमध्ये अनेक विद्यार्थी विद्यापीठ परिसरातून बाहेर पळना दिसत आहेत. तसंच सुरक्षा दलाचे जवान आतमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढताना दिसत आहेत. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. आम्ही हा हल्ला केला नसल्याचं तालिबानने म्हटलं आहे.

काबूलमध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध आहे. शैक्षणिक संस्थांना लक्ष्य बनवणं हा एक घोर गुन्हा आहे. विद्यार्थ्यांना शांततेत अभ्यास करण्याचा अधिकार आहे. पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल मनापासून संवेदना व्यक्त करतो, असं हाय काउन्सिल फॉर नॅशनल रिकॉन्सिलेशनचे प्रमुख अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी ट्विट करून सांगितलं.

देशातील सर्वात जुने विद्यापीठ

काबूल विद्यापीठाची स्थापना १९३२ मध्ये झाली. हे अफगाणिस्तानमधील सर्वात जुने, मोठे आणि प्रतिष्ठित सार्वजनिक विद्यापीठ आहे. यात २१ प्राध्यापक, ८९ हून अधिक विभाग, ८९६हून अधिक शैक्षणिक विद्याशाखा सदस्य आणि १७१९७ विद्यार्थी आहेत.

पंतप्रधान मोदींनी केला हल्ल्याचा निषेध

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काबूलमधील हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. दहशतवादाविरोधीतील लढाईत भारत कायम अफगाणिस्तानसोबत आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here