नवी दिल्लीः करोनाच्या संकटात दिल्लीहून चीनच्या वुहानला गेलेल्या विमानात १९ प्रवासी करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. ३० ऑक्टोबरला हे विमान वंदे भारत मिशन अंतर्गत गेलं होतं. उड्डाणातील एकूण २७७ प्रवाशांपैकी ३९ जणांमध्ये अॅन्टीबॉडीज आढळून आल्या आहेत. यामुळे विमानातील एकूण ५८ प्रवाशांना करोना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तर काहींना क्वारंटाइन केलं गेलंय. इतर प्रवाशांना १४ दिवसांसाठी वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ठेवलं जाईल.

फ्लाइटमध्ये बसलेल्या सर्व प्रवाशांकडे करोना चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह होते. हे रिपोर्ट प्रमाणित प्रयोगशाळेकडून घेतलेले होते. विमानातही करोना प्रोटोकॉलद्वारेही काळजी घेण्यात आली, असं एअर इंडियाने या प्रकरणी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

दुसरीकडे, देशातील करोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊन ती ५ लाख ५६ हजार ६९५ वर आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून यात सतत घसरण दिसून येतेय. १ सप्टेंबरला देशात २१.१६ टक्के अॅक्टिव्ह रुग्ण होते. आता ते ६.८६ टक्के आहे.

राज्यांच्या आकडेवारीचा विचार केला तर महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक २२.४७ टक्के अॅक्टिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यातही सतत घसरण होत आहे. दुसर्‍या क्रमांकावर केरळ आहे. तिथे १५.५७ टक्के आणि यानंतर कर्नाटकमध्ये ९.०८ टक्के रूग्णांवर उपचार सुरू आहेत. सर्वात कमी अॅक्टिव्ह रुग्ण हे दादरा आणि नगर हवेली, अंदमान-निकोबार आणि सिक्कीममध्ये आहेत. तसेच मृतांच्या संख्येतही घट दिसून आली आहे. सप्टेंबरच्या सुरूवातीस, दररोज सुमारे १ हजार मृत्यू होत होते. हा आकडा आता ५०० च्याही खाली आला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here