शिर्डी: देशात आधीच मोठे वाद चिघळलेले असताना शिर्डी की हा वाद का उकरून काढला जात आहे?, असा सवाल करतानाच ठेवून हा प्रश्न सुटणार नाही तर शांततेच्या मार्गाने चर्चा करून हा प्रश्न सोडवण्याची गरज असल्याचे मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद खुद्द साईबाबांनाही आवडणार नाही. त्यामुळे या प्रश्नाचे कुणीही राजकारण करू नये, असा टोलाही भुजबळ यांनी अप्रत्यक्षपणे भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना लगावला.

परभणीतील पाथरीचा साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून विकास करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर वादाला तोंड फुटले आहे. त्याला आव्हान देत शिर्डीकरांनी आजपासून बेमुदत शिर्डी बंद पुकारला आहे. या बंददरम्यानच आज छगन भुजबळ यांनी शिर्डीत जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी पत्रकारांशी बोलताना भुजबळ यांनी शिर्डी व पाथरीकरांना ‘सबुरी’ राखण्याचे आवाहन केले व हा प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवण्याचा सल्ला दिला.

साईबाबांच्या जन्मस्थळाचा जो वाद निर्माण करण्यात आला आहे, त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या बैठक घेणार आहेत. या बैठकीला शिर्डी व पाथरी या दोन्हीकडचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन वादावर पडदा पडेल अशी अपेक्षा आहे, असे भुजबळ यांनी नमूद केले. पत्रकारांनी पुन्हा पुन्हा सरकारची भूमिका विचारली असता, हा प्रश्न मुख्यमंत्री हाताळत आहेत. ते माझे बॉस आहेत. मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो. आता फक्त १५-५० तास वाट पाहायची आहे. त्यानंतर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्रीच देणार आहेत. त्यामुळे मी यावर अधिक बोलणं उचित ठरणार नाही, असेही भुजबळ म्हणाले.

शिर्डी बंद ठेवून हा प्रश्न सुटणार नाही. मुळात साईबाबांच्या जन्मस्थळाचा वादच निरर्थक आहे. खुद्द साईबाबांनाच ते आवडणार नाही. साईबाबांनी कधीच धर्म वा जात मानली नाही. मी सर्व धर्मांचा आणि जातींचा आहे, असे ते म्हणायचे. म्हणूनच भगव्यापासून हिरव्या झेंड्यापर्यंत सर्व झेंडे खांद्यावर घेणारे साईंच्या दरबारात नतमस्तक होता, असे नमूद करताना शिर्डी हे वादाचे ठिकाण होऊ नये. शिर्डीवरून कुणीही राजकारण करू नये, असे भुजबळ यांनी सुनावले.

भारतात साईबाबांची हजारो मंदिरे आहेत. भारताबाहेर अमेरिकेपासून जपानपर्यंत साईमंदिरे आहेत. अनेक ठिकाणे प्रतिशिर्डी म्हणून प्रसिद्ध आहेत. तरीही शिर्डीचे महत्त्व कायम आहे. साईभक्तांमध्ये शिर्डीप्रती विशेष आकर्षण आहे व ते कधीही कमी होणार नाही, असेही भुजबळ पुढे म्हणाले. महाविकास आघाडी सरकारने ५० दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्याबाबत प्रश्न विचारला असता साईबाबांच्या आशीर्वादानेच आम्ही सगळे एकत्र आलो आहोत, असे भुजबळ म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here