परभणीतील पाथरीचा साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून विकास करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर वादाला तोंड फुटले आहे. त्याला आव्हान देत शिर्डीकरांनी आजपासून बेमुदत शिर्डी बंद पुकारला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी याप्रश्नी सकारात्मक चर्चा करण्याचे आश्वासन देत बंद मागे घेण्याची विनंती शिर्डीकरांना केली. या विनंतीला मान देत शिर्डीकरांनी तूर्त बंद मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साईभक्त आहेत. त्यांनी आम्हाला चर्चेसाठी बोलावले आहे. या बैठकीत निश्चितच सकारात्मक चर्चा होईल व या वादावर पडदा पडेल, अशी आम्हाला आशा आहे. शिर्डीतील प्रतिष्ठित ग्रामस्थ बैठकीला उपस्थित राहणार आहेत’, असे ग्रामसभेनंतर सांगण्यात आले.
दरम्यान, बंद मागे घेण्याचा निर्णय ग्रामसभेत झाल्यानंतर लगेचच शिर्डीतील दुकाने उघडण्यात आली. अन्य व्यवहारही पूर्वपदावर येत आहेत.
बंदमुळे साईभक्तांचे हाल
शिर्डी बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. शिर्डीसह पंचक्रोशीतील गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान, शिर्डीत नेहमीच देशभरातून भाविक येत असतात. असंख्य भाविकांना बंदबाबत माहिती नव्हती. त्यामुळे शिर्डीत आलेल्या भाविकांची आज मोठी गैरसोय झाली. रविवारची सुट्टी असल्याने भाविकांची आज मोठी गर्दी झाली आहे. मात्र, बाजारपेठ बंद असल्यामुळं साईभक्तांचे हाल झाले. शिर्डीत आज सकाळी द्वारकामाईसमोर सर्वधर्म सद्भावना परिक्रमा रॅली देखील काढण्यात आली. या रॅलीची सुरवात ‘शिर्डी माझे पंढरपूर’ आरती करून करण्यात आली. यावेळी शिर्डीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. ‘ओम साई नमो नम: ‘ चा जयजयकार करीत पालखी मार्गाने परीक्रमा शहरात काढण्यात आली. यावेळी सुरक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times