कांजूरमार्ग येथे होणाऱ्या मेट्रो कारशेडच्या कामावर केंद्रानं आक्षेप घेतला असून मेट्रो कारशेडचं काम थांबवण्याचे आदेश केंद्रानं राज्य सरकारला दिले आहेत. केंद्राच्या या निर्णयावरुन राज्यात पुन्हा एकदा राजकारण रंगलं आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनीही केंद्रावर आणि भाजपवर निशाणा साधला आहे.
‘महाविकास आघाडी सरकारच्या राज्य हिताच्या निर्णयात भाजपा व मोदी सरकार सातत्याने अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहे. कांजूरमार्गची मेट्रो कारशेडची जागा ही राज्य सरकारचीच आहे’, असा दावा सचिन सावंत यांनी केला आहे. ‘त्या जागेवर १९८१ अगोदरपासून महाराष्ट्र शासन असं नाव लागलेलं आहे,’ असं ही त्यांनी म्हटलं आहे.
‘२०१५ साली विभागीय आयुक्तांनी स्लॉट डिपार्टमेंटला ही जमीन दिली गेल्याचे कोणतेही पुरावे देता आले नाहीत त्यामुळं त्यांचा दावा निकालात काढला होता. तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यावर शिक्कामोर्तब केले होते, असं असताना ३ वर्ष या निर्णयाला स्लॉट डिपार्टमेंटनं न्यायालयात आव्हान दिलं नाही. पण ३ वर्षांनंतर काम सुरू केल्यानंतर मात्र लगेच त्यांना आठवण झालीय हा योगायोग नाही. महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांमुळं मोदी सरकारने आडकाठी आणण्याची भूमिका घेतली,’असं म्हणत सचिन सावंत यांनी केंद्राच्या या भूमिकेचा निषेध नोंदवला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times