मुंबई: सासऱ्याचे घर पेटवून दिल्याप्रकरणी मुंबईतील पोलिसांनी २९ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. यात मेहुणा ३५ टक्के होरपळला आहे. तर घरात असलेले पत्नीचे आई-वडील, दोन बहिणी आणि पाच वर्षांचा भाचा किरकोळ जखमी झाला आहे. पत्नीने घरी येण्यास नकार दिल्याच्या रागातून आरोपीने हे कृत्य केल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल पोळ असे आरोपीचे नाव आहे. त्याची पत्नी आरती हिने घरी नांदायला येण्यास नकार दिला होता. काही दिवसांपूर्वी ती आपल्या माहेरी मुलुंडमधील इंदिरा नगर परिसरात राहायला आली होती. पत्नी घरी येत नसल्याच्या रागातून राहुलने घर पेटवून दिले. पोलिसांनी त्याला हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक केली आहे.

राहुल हे शिवणकाम करतो. एका दुकानात काम करत असताना, त्याची ओळख आरतीशी झाली. वर्षभरापूर्वी त्या दोघांनी लग्न केले. पोळ आणि आरती काही महिने धारावीत राहिले. त्यानंतर ते नालासोपारा येथे राहायला गेले. सासरच्या लोकांच्या मदतीने त्याने टेलरिंगचे दुकान सुरू केले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

त्रासाला कंटाळून ती माहेरी आली होती

आरोपीला दारूचे व्यसन होते. दारू पिऊन घरी आल्यानंतर तो पत्नीला मारहाण करायचा. नालासोपारा येथील स्थानिक पोलीस ठाण्यात तिने राहुलविरोधात तक्रारही दाखल केली होती. त्यानंतरही तो मारहाण करायचा. नेहमीच्या छळाला कंटाळून अखेर आरतीने माहेर गाठले. २५ ऑक्टोबर आणि २६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री सासरची मंडळी घरात झोपली होती. त्याचवेळी राहुल तेथे आला. त्याने घराच्या दारावर पेट्रोल ओतले आणि पेटवून दिले. यात त्याचा मेहुणा प्रकाश हा होरपळला. तो दरवाजाजवळच झोपला होता. तो ३५ टक्के भाजला आहे. तर दोन मेहुण्या आणि पाच वर्षांचा भाचा किरकोळ जखमी झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here