मुंबई मेट्रोच्या नव्या प्रकल्पासाठी आरे कॉलनी ऐवजी कांजूरमार्गमध्ये कारशेड उभारण्याचा निर्णय राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं नुकताच घेतला होता. मात्र, केंद्र सरकारच्या उद्योग व व्यापार संवर्धन विभागानं (डीपीआयआयटी) त्यास आक्षेप घेतला आहे ही जागा केंद्राच्या मालकीची असल्याचं सांगत कारशेडचं काम थांबवण्याच्या सूचना केंद्रानं केल्या आहेत. त्यावरून राजकारण रंगलं आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी प्रकल्पातील या अडथळ्यांसाठी राज्य सरकारच जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. तर, सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांनी केंद्र सरकारसह महाराष्ट्रातील भाजप नेत्यांवर तोफा डागल्या आहेत.
वाचा:
सुप्रिया सुळे यांनी देखील केंद्राच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ‘केंद्राची भूमिका धक्कादायक आहे. कुठल्याही कायद्यानुसार राज्यातील जमिनीवर राज्याचाच पहिला अधिकार असतो. पण केंद्रानं आता नवीनच काहीतरी काढलंय. राज्यांचे सगळे अधिकार काढून घेण्याचं काम केंद्र सरकार सातत्यानं करतंय. त्यांच्या कृतीतून ते दिसतंय. हे सगळं दुर्दैवी आहे,’ असं त्यांनी म्हटलं आहे.
वाचा:
‘केंद्र सरकार सरळसरळ महाराष्ट्राच्या विकासात हस्तक्षेप करतंय. जमीन महाराष्ट्राची, महाराष्ट्राच्या जनतेसाठी तिचा वापर होतोय. तिथं कुठलंही म्युझियम होत नाही किंवा व्यक्तिगत काम होत नाही. असं असताना केंद्र सरकारनं अशी भूमिका घेणं कितपत योग्य आहे. हा महाराष्ट्रावर अन्याय आहे, महाराष्ट्राशी दुजाभाव आहे. केंद्र सरकार केवळ संघराज्य पद्धतीबद्दल केवळ भाषणं देते. पण केंद्राला हळूहळू आणीबाणी आणायची आहे असं दिसत असल्याचा आरोप सुळे यांनी केला.
मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरून होत असलेला एक आरोपही सुप्रिया सुळे यांनी फेटाळून लावला. ‘महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य आहे. मंदिरांचे टाळे तोडण्याची भाषा मी कधीच ऐकलेली नाही. हे दुर्दैवी आहे. सत्ता नसल्यामुळे कदाचित त्यांना काहीच सूचत नाही, त्यामुळं कदाचित ते बिचारे असं वागत असतील,’ असा टोलाही त्यांनी हाणला.
हे भाजपचे कटकारस्थान!
‘कांजूरमार्ग कारशेड हा मुंबईच्या उपनगरीय रेल्वेमार्गांना जोडणारा प्रकल्प असून २० लाख लोकांना त्याचा फायदा होणार असल्यानं हे काम कसं थांबवायचं यासाठी भाजपकडून कटकारस्थान सुरू आहे. भाजपचे लोक सुरुवातीला ही खासगी जागा आहे सांगत होते आणि आता केंद्र सरकारच्या मालकीची आहे, असं म्हणत आहेत. त्यांना केवळ अडथळे आणायचे आहेत,’ असा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times