गेल्या महिन्यात संगमनेर तालुक्यात घरफोडी झाली होती. मुलांनीच आपल्या घरातून दागिन्यांची चोरी केली होती. वडील आजारी असल्याने आई त्यांच्यासोबत नाशिकला होती. याचा गैरफायदा घेऊन मुलाने मित्राच्या मदतीने स्वत:चेच घर फोडले. घरातून सुमारे सव्वा दोन लाखांचे दागिने चोरले. ते दागिने नाशिकच्या सराफाला विकले. आपले वडील आजारी असल्याने पैशांची गरज आहे, असे कारण सांगून त्यांनी दागिने विकले. त्या पैशांतून गोव्यात जाऊन मौजमजा केली. या प्रकरणाचा तपास परदेशी यांच्याकडे होता. त्यांनी आरोपींच्या मोबाइल नंबरच्या आधारे तांत्रिक पद्धतीने तपास केल्यावर आरोपी गोव्यात असल्याचे समजले. त्यानुसार परदेशी यांनी पथकासह जाऊन आरोपींना अटक केली. चौकशीत त्यांनी ज्याला सोने विकले, त्या नाशिकमधील सराफाचे नाव सांगितले होते.
आरोपींनी आपल्याच घरात केलेली चोरी, त्या पैशांतून केलेली मौजमजा आणि त्यानंतर गळाला लागलेला सराफ यामुळे पोलीस अधिकाऱ्याच्याही तोंडाला पाणी सुटले. चोरीचा माल घेणे हाही गुन्हा आहे. त्यामुळे सराफाला या गुन्ह्यात आरोपी करण्याचा धाक दाखवून पैसे उकळण्याची योजना आखली. सराफाकडून तब्बल दोन लाखांची लाच मागण्यात आली. लाच देण्याची सराफाची इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे संपर्क साधला. पोलीस अधीक्षक सुनील कडासणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने संगमनेर पोलीस ठाण्यात सापळा रचला. तेथे एक लाख रुपयांची लाच घेताना परदेशी यांना पकडण्यात आले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times