जळगाव: भाजप सोडून राष्ट्रवादीत गेल्यानंतर भाजपच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे संकट मोचन म्हणून ओळखले जाणारे यांच्या मतदार संघातच खडसेंनी फूट पाडली आहे. जामनेरयेथील २०० हून अधिक कार्यकर्ते आणि पदधिकाऱ्यांनी भाजपसोडून राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला आहे.

एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा दिल्यापासून जळगावातील भाजपचे कार्यकर्ते आणि पदधिकारी यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. आज तब्बल २०० हून अधिक कार्यकर्यांनी खडसेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा राज्यातील भाजप नेतृत्वासाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जातं आहे. यावरूनच, जळगावात अद्यापही खडसेंचं वर्चस्व कायम असल्याचं दिसून येत आहे. एकनाथ खडसेंच्या मुक्ताईनगर येथील फार्महाऊसवर या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यावेळी खडसेंची कन्या रोहिणी खडसे या देखील उपस्थित होत्या.

आणखी कार्यकर्ते येतील- खडसे
जामनेर तालुक्यातील अनेक भाजप कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हे कार्यकर्ते यापूर्वी भाजपचे नि:स्वार्थपणे काम करत होते. त्यातील काही कार्यकर्ते हे भाजपचे पदाधिकारी होते, तर काही कार्यकर्ते हे आजही भाजपचे पदाधिकारी म्हणून काम करत होते. परंतु, अलीकडे ते पक्ष नेतृत्त्वावर नाराज होते. त्यामुळे त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. यापुढच्या काळात असे अनेक भाजप कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल होतील. त्यामुळे राष्ट्रवादीला अधिक बळकटी येईल, असा विश्वास एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला.

जिल्हा होणार राष्ट्रवादीमय होणार; रविंद्र पाटलांना विश्वास

खडसेंच्या मुक्ताईनगरातील फार्म हाऊसवर झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष प्रवेश सोहळ्याला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अड. रवींद्र पाटील, जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ऍड. रोहिणी खडसे-खेवलकर उपस्थित होते. यावेळी अड. रवींद्र पाटील म्हणाले की, एकनाथ खडसे हे ज्येष्ठ नेते आहेत. ते राष्ट्रवादीत असल्याने पक्षाची ताकद वाढली आहे. त्यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवून अनेक भाजप कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल होत आहेत. यापुढे जळगाव जिल्ह्यातील अनेक गावे राष्ट्रवादीमय होतील, असे ऍड. पाटील यांनी सांगितले.

एकनाख खडसे विरुद्ध गिरीश महाजन
भाजप सरकारच्या काळात जळगावात एकनाथ खडसे यांचे प्रतिस्पर्धी म्हणून गिरीश महाजन यांच्याकडे पाहिलं जायचं. त्यातच गिरीश महाजन यांच्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांना वेळोवेळी डावललं असल्याचा आरोप खडसेंनी केला होता. यामुळंच, जळगावात खडसे आणि महाजन असे दोन गट तयार झाले आहेत. खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर हा संघर्ष अधीक तीव्र होत गेला आहे.

खडसे आक्रमक
खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर भाजपला आव्हान दिलं होतं. जळगावात चारी बाजूला फक्त राष्ट्रवादीच असणार असा दावाच त्यांनी केला होता. तसंच, भाजपवर अनेक कार्यकर्ते नाराज असल्याने ते आपले राजीनामे देत आहेत, असे एकनाथ खडसे म्हणाले होते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here