बेंगळुरू: सलामीवीर रोहित शर्माचे खणखणीत शतक आणि कर्णधार विराट कोहलीच्या ८९ धावांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने बेंगळुरू वनडेत दणदणीत विजय साकारला असून तीन सामन्यांची मालिका २-१ अशा फरकाने खेचून आणली आहे. नवीन वर्षातील भारताचा हा सलग दुसरा मालिकाविजय ठरला आहे. वर्षारंभीच भारताने टी-२० मालिकेत श्रीलंकेचा २-० असा धुव्वा उडवला होता. दरम्यान, ८ चौकार आणि ६ षटकारांसह १२८ चेंडूंत ११९ धावांची खेळी करणारा रोहित शर्मा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
मुंबईतील सामना पाहुण्या ऑस्ट्रेलियाने तर राजकोटमधील सामना भारताने जिंकल्याने मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना निर्णायक ठरणार होता. हा सामना जिंकणारा संघ मालिकेवर आपले नाव कोरणार होता. हे आव्हान भारताने स्वीकारले आणि गोलंदाजी व फलंदाजीत वर्चस्व गाजवत विजय खेचून आणला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना भारतापुढे विजयासाठी २८७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य सात गडी राखून ४७.३ षटकांत भारताने सहज गाठले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times