पुणे: बाधित रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्याने आणि शहरांमधील खासगी रुग्णालयांमध्ये राखीव ठेवलेल्या खाटा या कमी केल्या जाणार आहेत. त्यामुळे नॉन कोव्हिड रुग्णांवर उपचारांसाठी मार्ग मोकळा होणार आहे. मात्र, करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून ‘सर्वंकष आराखडा’ तयार करण्यात आला आहे. त्यानुसार खासगी रुग्णालयांतील खाटा या पुन्हा ताब्यात घेतल्या जाणार असून, जम्बो सेंटरसह सरकारी रुग्णालयांमध्ये सुमारे आठ हजार रुग्णांवर उपचार करण्याची व्यवस्था तयार ठेवण्यात येणार आहे. ( Latest Updates )

वाचा:

विभागीय आयुक्त यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘करोना बाधित रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांमधील करोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी राखीव ठेवलेल्या खाटा या कमी करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे नॉन कोव्हिड रुग्णांसाठी खाटा उपलब्ध होण्यातील अडचण दूर होणार आहे. मात्र, दुसरी लाट आली, तर करोना बाधित रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्यांचा शोध घेणे, दैनंदिन चाचण्या आणि खासगी रुग्णालयांमधील खाटा पुन्हा ताब्यात घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.’

वाचा:

‘जिल्ह्यातील दैनंदिन करोना बाधित रुग्णांचे प्रमाण हे सहा ते १९ ऑक्टोबर या कालावधीत १७ टक्के, २० ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर या कालावधीत ११ टक्के होते. हे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यास खासगी रुग्णालयांतील खाटा राखीव ठेवण्यास सुरुवात केली जाणार आहे. दरम्यान , नायडू रुग्णालय, यशवंतराव चव्हाण रुग्णालय आणि जम्बो सेंटर या ठिकाणी सुमारे आठ हजार रुग्णांवर उपचार करण्याची व्यवस्था असणार आहे. त्यासाठी या ठिकाणी किमान अडीच हजार खाटा या उपलब्ध करून ठेवल्या जाणार आहेत’, असे राव यांनी स्पष्ट केले.

‘पुणे जिल्ह्यातील करोना बाधित रुग्णांचा मृत्यूचा दर हा कमी होत चालला आहे. पाच आठवड्यापूर्वी प्रति आठवड्याला ५५४ रुग्णांचे मृत्यू झाले होते. त्यानंतर हे प्रमाण कमी होऊन गेल्या आठवड्यात २०५ पर्यंत आले आहे’, अशी माहिती राव यांनी दिली.

वाचा:

अशी केली जाणार तयारी
‘दुसऱ्या लाटेची शक्यता निर्माण झाल्यास रुग्णांवर उपचार करण्यासाठी कशी तयारी करायची, याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. त्यानुसार सर्वाधिक सक्रिय रुग्ण आढळून आलेल्या दिवसातील रुग्णसंख्येत दहा टक्के वाढ करून ती संख्या आधारभूत मानून त्याप्रमाणे रुग्णांच्या उपचाराची तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार १६ सप्टेंबरला सर्वाधिक सक्रिय रुग्ण होते. त्यादृष्टीने ऑक्सिजनयुक्त खाटा, मनुष्यबळ यांची तयारी करण्यात येणार आहे’, असे राव यांनी सांगितले. ‘करोना बाधित रुग्णांसाठी राखीव ठेवलेल्या खाटा या कशा पद्धतीने कमी करायच्या, याबाबतचा निर्णय घेण्यासाठी आज रुग्णालय चालकांबरोबर बैठक घेण्यात येणार आहे. हा निर्णय घेताना रुग्णालय चालकांची मते विचारात घेतली जाणार आहे,’ असेही राव यांनी सांगितले.

पुणे शहरातील २३ पैकी १८ कोविड सेंटर बंद

‘करोना बाधित रुग्णांची संख्या घटत असल्याने कोव्हिड केअर सेंटर बंद करण्यात येणार आहेत. पुणे शहरातील २३ सेंटरपैकी १८ सेंटर बंद करण्यात आली आहेत. पुण्यात पाच आणि पिंपरी चिंचवडमध्ये एक सेंटर सुरू आहे’, असे राव म्हणाले. करोना बाधित रुग्णांची संख्या कमी होत असली तरी सरकारी रुग्णालये आणि जम्बो सेंटरमध्ये नियुक्त करण्यात आलेले मनुष्यबळ हे कमी करण्यात येणार नाही. काही ठिकाणी कंत्राटी पद्धतीने सहा महिन्यांसाठी मनुष्यबळ घेण्यात आले आहे. त्यांचे कंत्राट किमान २६ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे, असे राव यांनी सांगितले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here