रोहित हा दुखापतग्रस्त असल्यामुळे त्याचा विचार आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात होणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले होते. रोहितला त्यामुळेच संघात घेतले नसल्याचे निवड समितीनेही सांगितले होते. पण रोहित आजच्या आयपीएलमधील सामन्यात खेळला आणि आपण फिट असल्याचे त्यानने दाखवून दिले. त्यामुळे आता रोहित भारताकडून खेळण्यासाठी सज्ज झाला आहे का, याचे उत्तर गावस्कर यांनी दिले.
मुंबई आणि हैदराबाद यांच्यातील सामना संपल्यावर गावस्कर म्हणाले की, ” रोहित हा सध्याच्या घडीला क्रिकेट विश्वातील अव्वल फलंदाजांपैकी एक नक्कीच आहे. रोहित दुखापतग्रस्त होता, त्यामुळे त्याचा विचार ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ निवडताना केला गेला नसावा. पण आता रोहित शर्मा या सामन्यात खेळला म्हणजे तो फिट झाला आहे. रोहित जर पूर्णपणे फिट असेल तर नक्कीच त्याला भारतीय संघात स्थान द्यायला हवे.”
रोहित दुखापतग्रस्त असल्यामुळे त्याची निव़ड ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी झाली नव्हती. बीसीसीआयच्या वैद्यकीय समितीने याबाबतचा अहवालही दिला होता. त्यानंतर भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही रोहित जर दुखापतग्रस्त असेल तर त्याने ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर येऊ नये, असे म्हटले होते. पण रोहितने आजच्या सामन्यात खेळत या सर्वांनाच एक जोरदार चपराक लगावल्याचे पाहायला मिळत आहे.
एका मुलाखतीत सौरव गांगुली म्हणाला, “आपल्या सर्वांची इच्छा आहे की रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जावा. पण तो फिट झाला पाहिजे. जर तो फिट झाला तर निवड समिती पुन्हा त्याला संघात घेण्याबद्दल नक्कीच विचार करेल. रोहित नक्कीच ऑस्ट्रेलियाला जाऊ शकतो. फक्त तो फिट असला पाहिजे.” आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या गैरहजेरीत सध्या कायरॉन पोलार्ड संघाचे नेतृत्व करत आहे. मुंबईने गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळवून प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे. आता त्यांची लढत पहिल्या क्वालीफायरमध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होणार आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times