म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबईत सोमवारपासून दवाखाने आणि रुग्णालयात २४४ ठिकाणी मोफत चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत. याच ठिकाणी करोनाची प्रतिबंधात्मक लस देता येईल, का याची चाचपणी पालिकेने सुरू केली आहे. मुंबईकरांना ही लस मोफत देता येईल का, याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती महापौर यांनी दिली.

करोना रोखण्यासाठी पालिका आणि राज्य सरकारमार्फत विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू आहेत. पालिकेचे ‘व्हायरसचा पाठलाग’ आणि ‘मिशन झिरो’ तर राज्य सरकारची ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम सुरू असून, त्यामुळे करोनाचा संसर्ग नियंत्रण ठेवण्यात यश आले आहे. त्यासोबतच मुंबईसह देशभरात करोनाची मानवी चाचणी सुरू आहे. मुंबईतील केईएम आणि नायर रुग्णालयात प्रत्येकी १०० रुग्णांवर ही चाचणी सुरू असून चाचणीचा दुसरा टप्पा सुरू आहे, अशी माहिती महापौरांनी दिली.

दरम्यान, मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेतील कंत्राटी कर्मचारी जीव धोक्यात घालून करोनाच्या संकटात काम करीत असून त्यांना मार्चपासून करोना काळातील भत्ता प्रलंबित आहे. हा भत्ता दिवाळीपूर्वी देण्यात यावा, असे निर्देश महापौरांनी दिले आहेत. मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेचे कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे व कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक नुकतीच महापौरांनी घेतली. तसेच या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्याबाबत पालिका आयुक्तांसोबत सोबत चर्चा केली असून, बोनस देण्यासाठी अर्थसंकल्पात शीर्ष (बजेट हेड) सुरू करण्याचे पत्र देण्याचे निर्देशही महापौरांनी दिले.

पहिली लस करोनायोद्ध्यांना

करोनाची मानवी चाचणी यशस्वी झाल्यास, तसेच परदेशातूनही करोना प्रतिबंधात्मक लस आल्यास करोनाच्या संकटात आपला जीव धोक्यात घालून आरोग्यसेवा बजावणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय यांसह इतर करोनायोद्धांना पहिल्यांदा ही लस मोफत दिली जाणार आहे, असे महापौरांनी सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here