म. टा. प्रतिनिधी, मुंबई

ई-कॉमर्सला टक्कर देण्यासाठी देशी ‘भारत ई-मार्केट’ ऑनलाइन अॅप येऊ घातले आहे. त्याच्या लोगोचे अनावरण झाल्यानंतर आता यावर व्यापाऱ्यांना जोडण्यासाठी सर्वेक्षण सुरू असून, मुंबईतील १० लाख व्यापाऱ्यांना जोडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

सणासुदीचे दिवस सुरू झाल्याने ऑनलाइन विक्री करणाऱ्या पोर्टल तसेच अॅपवर विविध प्रकारचे खरेदीउत्सव सुरू झाले आहेत. त्यामध्ये विविध प्रकारच्या ऑफरचा समावेश आहे. परंतु याचा देशातील पारंपरिक किरकोळ व्यापारावर परिणाम होत आहे. यासाठीच या व्यापाऱ्यांनी आता स्वत:चेच विक्री पोर्टल सुरू करण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठीचे सर्वेक्षण देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत जोमाने सुरू झाले आहे.

‘भारत ई-मार्केट’ नावे असलेल्या या पोर्टलसाठी अ.भा. व्यापारी महासंघाने (कॅट) पुढाकार घेतला आहे. ‘कॅट’चे मुंबई प्रदेश अध्यक्ष शंकरभाई ठक्कर यांनी सांगितले की, ‘आधी मॉलसंस्कृती व त्यानंतर आता ऑनलाइन पोर्टल, या दोघांनी मिळून देशातील ७० ते ८० टक्के किरकोळ व्यापार बंद पाडला आहे. पण त्यासाठी रडत न बसता काळानुरूप बदलण्याच्या दृष्टीने ‘कॅट’ने देशभरातील व्यापाऱ्यांनाच ऑनलाइन बाजाराच्या एका साखळीत बांधण्याचा निर्णय घेतल आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने या अंतर्गत मुंबईतील व्यापाऱ्यांचे सर्वेक्षण सुरु झाले आहे. लवकरच हे पोर्टल मोठ्या स्वरुपात नावारूपास येईल.’

नि:शुल्क घरपोच सेवा

देशभरातील २० हजार व्यापारी संघटना ‘कॅट’च्या सदस्य आहेत. पण या आता ‘भारत ई-मार्केट’साठी आणखी २५ हजार संघटनांनी संघटनेला सहकार्य देऊ केले आहे. मुंबई प्रदेशात मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर व रायगडमधील व्यापाऱ्यांचा समावेश आहे. मुख्य म्हणजे, या पोर्टलशी जुळलेल्या व्यापाऱ्यांना एक रुपयाचे कमिशनही द्यावे लागणार नाही. तसेच ग्राहकांना सामानाची नि:शुल्क घरपोच सेवा दिली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांचे सर्वेक्षण केले जात असल्याचे ठक्कर यांनी सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here