अन्वय नाईक यांनी रिपब्लिक टीव्ही चॅनेलच्या स्टुडिओच्या इंटेरियर डिझाई चे काम केले होते. त्यासाठी त्यांना अर्णब यांच्याकडून ५ कोटी ४० लाख रुपये येणे होते. परंतु वारंवार बिल मागूनही गोस्वामी यांच्याकडून पैसे दिले जात नव्हते. त्यामुळे मानसिक तणावाखाली अन्वय नाईक यांनी अलिबागजवळच्या कावीर गावात आत्महत्या केली होती. त्यानंतर त्यांच्या आईने देखील आत्महत्या केली. अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्यामुळं आलेल्या नैराश्यातून आत्महत्या करत असल्याचा आरोप नाईक यांनी आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात लिहिलं होतं. या प्रकरणी अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता यांनी केलेल्या तक्रारीनंतर अलिबाग पोलिसांनी ३०६ कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी चौकशीसाठी अलिबाग पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. वरळी येथील घरातून त्यांना आज सकाळी ताब्यात घेण्यात आलं.
अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा हिनं मे महिन्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती. रिपब्लिक टीव्हीने पैसे थकवल्याची चौकशी अलिबाग पोलिसांनी केलेली नाही, अशी तक्रार तिनं केली होती. त्यानंतर या प्रकरणाची नव्यानं सीआयडी चौकशी करण्याचे आदेश देशमुख यांनी दिले होते.
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात पोलीस ठाण्यामध्ये येऊन जबाब नोंदवण्यासाठी अर्णब यांना पोलिसांनी अनेकदा नोटिस पाठवली होती. मात्र, मी पोलिसांशी अजिबात बोलणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. अखेर आज पोलिसांनी थेट कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले. त्याचबरोबर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या पथकाने कांदिवलीहून फिरोझ शेख आणि जोगेश्वरी येथून नितेश सारडा यांनाही अटक केली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times