नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी २०१४ मध्येही शिवसेनेने व राष्ट्रवादी काँग्रेसपुढे महाआघाडी करून सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता, असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री यांनी ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. शिवसेनेचा हा प्रस्ताव काँग्रेसने तेव्हा लगेचच फेटाळला होता, असेही चव्हाण यांनी पुढे स्पष्ट केले.

व काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या विचारधारा परस्पर विरुद्ध असतानाही या दोन पक्षांची मैत्री कशी होऊ शकली, या प्रश्नावर उत्तर देताना पृथ्वीराज चव्हाण यांनी पाच वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर बोट ठेवले. पाच वर्षांपूर्वीही अशीच स्थिती निर्माण झाली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात भाजपचं अल्पमतातलं सरकार विराजमान झालं होतं. शिवसेना तेव्हा विरोधी बाकांवर बसली होती. तेव्हा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून माझ्याकडे आघाडीचा प्रस्ताव आला होता. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन महाआघाडी स्थापन करू व भाजपला सत्तेतून दूर करू, असा हा प्रस्ताव होता. मात्र, हा प्रस्ताव मी लगेचच फेटाळून लावला. जय-पराजय होतच असतात. काँग्रेसच्या पदरी यावेळी पराभव आला आहे. या पराभवाने काही डोंगर कोसळलेलं नाही. याआधीही असे पराभव झालेत व विरोधी पक्षात आम्ही बसलोत, असे परखड मत नोंदवत तेव्हा मी आघाडीचा प्रस्ताव फेटाळला होता, असा दावा चव्हाण यांनी केला.

२०१४ आणि २०१९च्या स्थितीत बरेच अंतर आहे. फडणवीस सरकारने गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील लोकशाही संपवण्याचेच प्रयत्न केले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या किमान ४० आमदारांना फोडून भाजपात घेण्यात आले. ब्लॅकमेल करून तसेच पदांचे आमीष दाखवून ही फोडाफोडी करण्यात आली. एकट्या भाजपच्या हाती सत्ता असावी व विरोधी पक्ष संपवावा, हे एककलमी धोरण भाजपचे राहिले. शिवाय सर्वच पातळीवर भ्रष्टाचारही बोकाळला होता. या स्थितीत आणखी पाच वर्षे भाजपच्या हाती सत्ता गेल्यास महाराष्ट्रातील लोकशाही संपुष्टात येईल, अशी भीती स्पष्ट दिसत होती. या स्थितीत काँग्रेसला भूमिका बदलावी लागली व पर्यायी सरकारचा विचार त्यातूनच पुढे आला, असे चव्हाण यांनी पुढे नमूद केले. भाजप-शिवसेनेत वाद निर्माण होताच सर्वात आधी मीच पर्यायी सरकारसाठी पुढाकार घेतला. त्यातून तिन्ही पक्षांमध्ये प्रत्यक्ष चर्चा सुरू झाली. सुरुवातीला पक्षश्रेष्ठी नाराज झाले. शिवसेनेसोबत आघाडी करण्याचा विचार कसा काय होऊ शकतो?, असा प्रश्न विचारला गेला. सोनिया गांधी तर आघाडीसाठी बिलकुल तयार नव्हत्या. त्यात केरळमधील नेत्यांनीही विरोधाचा सूर लावला. मात्र, मी आग्रही होतो. मी सर्व आमदारांशी बोललो. पक्षातील अल्पसंख्यांक नेत्यांशीही चर्चा केली. भाजप आपला शत्रू नंबर एक आहे व भाजपला सत्तेपासून रोखण्याची आपल्याला संधी आहे, हे मी सर्वांना पटवून दिले आणि मग सर्वांचीच त्यावर सहमती झाली, असे चव्हाण म्हणाले.

चव्हाण म्हणाले…

> महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्षे चालेल याची हमी देता येणार नाही मात्र विरोधी पक्षांना संपवायला निघालेल्या भाजपविरुद्ध ही आघाडी बनली आहे आणि याच मुद्द्यावर हे सरकार टिकणार आहे.

> अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतला आहे. त्यावर मी टिपण्णी करणे उचित ठरणार नाही.

> मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात या सर्वांच्या नेतृत्वाखाली मी काम करावं, हे काही मला संयुक्तिक वाटले नाही. म्हणून मी मंत्रिपदासाठी इच्छूक नव्हतो.

> मला विधानसभा अध्यक्षपदासाठी विचारणा करण्यात आली होती मात्र सक्रिय राजकारणात राहायचे असल्याने मी त्यास नकार दिला. काँग्रेस नेतृत्व येत्या काळात माझ्यावर जी जबाबदारी देईल ती स्वीकारायला मी तयार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here