मुंबई: इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आलेले रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक आणि रिपब्लिक टीव्हीविरोधात मुंबईत अनेक गुन्हे दाखल आहेत. नेमके ती प्रकरणे कोणती आहेत, हे जाणून घेऊयात.

अर्णब गोस्वामींविरोधात ‘चॅप्टर’ प्रक्रिया

टीआरपी घोटाळ्यामध्ये रिपब्लिक वाहिनीचे नाव आले असतानाच, दुसरीकडे पोलिसांनी ‘चॅप्टर’ प्रक्रिया सुरू केल्याने संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. लॉकडाउन कालावधीत रिपब्लिक वाहिनीवरील ‘पुछता है भारत’ या कार्यक्रमात तसेच चर्चासत्रामध्ये दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्ये केल्यामुळे गोस्वामी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. गोस्वामी यांना अटक टाळण्यासाठी प्रक्षोभक वक्तव्य करणार नसल्याचे लेखी बंधपत्र द्यावे लागणार असून, जामीन म्हणून दहा लाख रुपये भरावे लागणार आहेत. या प्रकरणात दोनदा अर्णबचे वकील पोलिसांना सामोरे गेले.

रिपब्लिक टीव्हीविरोधात गुन्हा

अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीच्या अडचणींत आता आणखी भर पडली आहे. दलात असंतोष असून, पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे आदेश कुणीही पाळत नाही, असे वृत्त प्रसारित केल्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या अँकरसह सहा जणांविरोधात ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चौघांचे जबाब नोंदविण्यात आले.

दोन समुदायात तेढ निर्माण केल्याप्रकणी गुन्हा

रिपब्लिक भारत या वाहिनीवर २१ एप्रिल रोजी पालघर येथे झालेल्या दोन साधूंच्या हत्येच्या बातमीच्या अनुषंगाने चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात बोलताना अर्णब गोस्वामी यांनी हिंदू आणि मुस्लिम समाजात तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्ये केली. यासंदर्भात त्यांच्या विरोधात ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला.

पायधुनी पोलिस ठाण्यात गुन्हा

१४ एप्रिल रोजी केलेल्या वार्तांकनामध्ये वांद्रे स्थानकावर जमलेल्या गर्दीचा संबंध मस्जिदशी जोडण्यात आला. या प्रकरणी पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

टीआरपी घोटाळा

पैसे देऊन कृत्रिमरित्या टीआरपी वाढविण्याचा घोटाळ्यात इतर वाहिन्यांबरोबर रिपब्लिक वाहिनीचे नावही समोर आले आहे. आरोपींनी रिपब्लिककडून पैसे घेतल्याचे कबूल केले असल्याचे गुन्हे शाखेने न्यायालयात सांगितले. रिपब्लिक वाहिनीतील अनेकांचे जबाब या प्रकरणात नोंदवण्यात आले; मात्र अद्याप कुणाला अटक करण्यात आलेली नाही.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here