मुंबई: इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक यांना बुधवारी अलिबाग पोलिसांनी अटक केली. नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. गोस्वामी यांना अलिबागला घेऊन गेले आहेत. त्यांची चौकशी केल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमुद नाईक हे अलिबागमधील त्यांच्या बंगल्यात मृतावस्थेत आढळून आले होते. मे २०१८ मध्ये ही घटना घडली होती. अन्वय नाईक यांची मुंबईत कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड नावाची कंपनी होती. ते अलिबागजवळील कावीर येथील आपल्या घरी आले होते. त्यांनी तिथे गळफास घेऊन आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांच्या आई कुमुद यांचा मृतदेह तळमजल्यावर सोफ्यावर आढळला होता. तर पहिल्या मजल्यावर अन्वय यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला होता. त्यांच्या नोकरांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. नाईक यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली होती. त्यात अर्णब गोस्वामी, आयकास्ट स्लॉशस्काय मीडियाचे फिरोज शेख, स्मार्ट वर्क्सचे सारडा आदींनी पैसे थकवल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यानंतर अलिबाग पोलिसांनी या तिघांविरोधात नाईक यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता.

अर्णब गोस्वामींवर का दाखल केला होता एफआयआर?

अन्वय नाईक यांच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट सापडली होती. त्यात अर्णब गोस्वामी, आयकास्ट स्लॉशस्काय मीडियाचे फिरोज शेख, स्मार्ट वर्क्सचे सारडा यांची नावे होती. त्यांनी पैसे थकवल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे अन्वय यांनी मृत्यूपूर्वी नमूद केले होते. या कंपन्यांनी अनुक्रमे ८३ लाख, चार कोटी आणि ५५ लाख रुपये थकवल्याचे म्हटले होते. त्यामुळे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

चौकशीचं काय झालं?

या प्रकरणाची रायगड पोलिसांनी चौकशी केली. यात अर्णब गोस्वामी आणि इतर संशयित आरोपींविरोधात ठोस पुरावे न सापडल्याने एप्रिल २०१९ मध्ये या प्रकरणाची चौकशी थांबवण्यात आली होती. तथापि, यावर्षी मे मध्ये अन्वय यांच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यात यावी, अशी विनंती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली. रिपब्लिक टीव्हीने पैसे थकवल्याची चौकशी अलिबाग पोलिसांनी केली नाही, अशी तक्रार त्यांनी केली होती. त्यानंतर या प्रकरणाची नव्याने सीआयडी चौकशी करण्याचे आदेश देशमुख यांनी दिले होते.

या अटकेनंतर काय?

गोस्वामींना या प्रकरणात अटक करण्यात आली असून, त्यांची चौकशी करण्यात येईल. अन्वय यांना सगळे पैसे दिल्याचा दावा गोस्वामी यांनी केला होता. त्यामुळे पैसे अदा केल्याचे पुरावे पुन्हा सादर करण्यास गोस्वामींना सांगितले जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची चौकशी थांबवायची की आरोपपत्र दाखल करायचे हे आता पुढील चौकशीत काय निष्पन्न होते, यावर अवलंबून आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here