याबाबत ३० वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानुसार सुरज चंद्रकांत माने (२०, रा. धनकवडी) याच्यावर ‘आयटी अॅक्ट’सह बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला एका रुग्णालयात आया म्हणून काम करतात. कामावरून घरी जाताना एका महिलेने फोन करण्यासाठी त्यांचा मोबाइल घेतला होता. त्यानंतर काही वेळातच आरोपीने तक्रारदार महिलेच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर मेसेज केला. मात्र, महिलेने त्याला प्रतिसाद दिला नाही; परंतु तरीही आरोपी वारंवार त्यांना मेसेज करत होता. शेवटी महिलेने आरोपीला समजावून सांगून त्याचा नंबर ‘ब्लॉक’ केला. काही दिवसांनंतर परत आरोपी महिलेला फोन करू लागला. यातून आरोपीसोबत ओळख झाली. त्यानंतर एके दिवशी महिला कामावरून घरी जात असताना आरोपीने त्यांना भारती हॉस्पिटलसमोर अडवले. यानंतर त्यांच्या गळ्याला चाकू लावून नवले ब्रिज येथील एका लॉजवर नेले. त्यानंतर त्या ठिकाणी महिलेवर बलात्कार केला. या वेळी आरोपीने महिलेचे फोटो काढले. पुढे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार महिलेवर आत्याचार केले. सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून शेवटी महिलेने आपल्याबरोबर झालेला प्रकार पतीच्या कानावर घातला. या प्रकरणी पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे करीत आहेत.
सततच्या त्रासाने पोलिसांकडे धाव
बदनामीच्या भीतीपोटी ते सर्व त्यांच्या सांगली जिल्ह्यातील मूळ गावी गेले; तरीही आरोपी सतत त्रास देऊन महिलेला लग्नाची मागणी घालत होता. महिलेने लग्न करण्यास नकार दिला. याचा राग येऊन आरोपीने महिलेचे फोटो टिकटॉक व फेसबुकवर पोस्ट केले; तसेच तिच्या पतीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. शेवटी महिलेने आटपाडी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानंतर तेथील स्थानिक पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याकडे वर्ग केला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times